इंटरनॅशनल क्रॉपस रीसर्च इन्स्टिटय़ूट फॉर सेमी अरिड ट्रॉपिक्स म्हणजे आयसीआरआयसॅट या संस्थेच्या जनुकपेढीचे प्रमुख हरी डी. उपाध्याय यांना अमेरिकेत फ्लोरिडा येथे क्रॉप सायन्स सोसायटीच्या वार्षिक बैठकीत फ्रँक एन मेयर या पदकाने गौरवण्यात आले. वनस्पती जनुकीय स्रोत शोधांसाठी हे पदक दिले जाते. जागतिक अन्न व पोषण सुरक्षेसाठी जनुकीय स्रोतांचा वापर या विषयावर उपाध्याय यांनी सांगितले की, जगात अन्नाची गरज वाढत आहे ती पुरवायची असेल तर जनुकीय अन्न स्रोत वाढले पाहिजेत त्यामुळे लोकांना पोषक अन्न मिळू शकेल. इ.स. २०५० मध्ये जगातील लोकसंख्या ९ अब्ज असेल व एवढय़ा लोकसंख्येला पुरवण्यसाठी अन्न उत्पादनात ७० टक्के वाढ करावी लागेल.
हवामानात होत असलेले बदल, कीटकांचा व किडय़ांमुळे रोगांचा पिकांवर होत असलेला प्रादुर्भाव, पोषक मूल्ये असलेल्या पिकांचे घटते प्रमाण  बघता जनुकीय स्रोतांचा वापर करून नवीन पिकांची निर्मिती करणे शक्य आहे. आयसीआरआयसॅट या संस्थेत संशोधन करताना आम्ही क्षारता, विविध प्रकारचे रोग व दुष्काळ अशा प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या पिकांच्या जाती तयार केल्या
आहेत.
त्यात भुईमूग, ज्वारी, बाजरी, चवळी यासारख्या पिकांचा समावेश आहे. पिकांच्या जंगली जातींमधील जनुके वापरून कीड, कीटक यांना तोंड देऊ शकतील अशा प्रजाती तयार करणे आवश्यक आहे. जनुकीय साधनांमुळे आपल्याला कृषिवैविध्य साधता येईल असे त्यांनी सांगितले.