सूरतमधील स्वामीनारायण मंदिरातील देवाच्या मूर्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने मोठा वाद निर्माण झाला. संघाचा गणवेश असलेला पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि काळे बूट परिधान केलेल्या स्वामीनारायणाच्या मुर्तीचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. याशिवाय, मुर्तीच्या हातात भारताचा राष्ट्रध्वजही आहे. सूरतमधील लस्काना भागात हे मंदिर आहे. मंदिरातील स्वामी विश्वप्रकाश यांच्या माहितीनुसार काही दिवसांपू्र्वी एका भक्ताने हा गणवेश देवाला अर्पण केला होता. आमच्याकडे नेहमीच देवाच्या मुर्तीला भक्तांकडून देण्यात आलेले विविध कपडे घालून सजविण्यात येते. संघाचा गणवेशही एका भक्ताकडूनच देण्यात आला होता. त्यामुळे या सगळ्यामागे आमचा कोणता अन्य हेतू नाही. यामुळे इतका वाद उत्पन्न होईल याची कल्पनाही आम्ही केली नव्हती, असे विश्वप्रकाश यांनी सांगितले.
काँग्रसने हा प्रकार अत्यंत दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. देवाच्या अंगावर खाकी चड्डी चढवून तुम्ही काय सिद्ध करू पाहत आहात? या प्रकारामुळे मला खूप दु:ख झाले आहे. आज तुम्ही देवाच्या मुर्तीला संघाचा गणवेश घातलात, उद्या तुम्ही देवाला भाजपचा गणवेश घालाल. हा संपूर्ण प्रकार अत्यंत दुर्देवी असल्याचे काँग्रेस नेते शंकरसिंह वाघेला यांनी सांगितले.