काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेस नसती तर ममता बॅनर्जींसारख्या व्यक्ती जन्माला आल्या नसत्या हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला जेव्हा त्यांनी भारतातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसवर अवलंबून राहण्यात कोणताही अर्थ नसल्याचे म्हटले होते. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशसह चार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयानंतर आणि पंजाब राज्य आम आदमी पक्षाकडून पराभूत झाल्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी टिप्पणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 “भाजपाला खूश करण्यासाठी गोव्यात गेलात”

“तुम्ही काँग्रेसविरोधात का भाष्य करत आहात? काँग्रेस नसती तर ममता बॅनर्जींसारखी व्यक्ती जन्माला आल्या नसत्या. त्यांनी हे लक्षात ठेवावे. भाजपाला खूश करण्यासाठी त्या गोव्यात गेल्या आणि त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. तुम्ही काँग्रेसला कमकुवत केले. गोव्यात हे सर्वांना माहीत आहे,” असे अधीर रंजन यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी भाजपाच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे. “त्या (ममता बॅनर्जी) भाजपला खूश करण्यासाठी आणि भाजपाचे एजंट म्हणून काम करण्यासाठी त्या असे बोलत आहेत. त्या चर्चेत राहण्यासाठी अशा गोष्टी बोलतात. वेड्याला प्रत्युत्तर देणे योग्य आहे. काँग्रेसकडे भारतभर ७०० आमदार आहेत. हे ममतांकडे आहेत का? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी २० टक्के मते काँग्रेसकडे आहेत. ही त्यांच्याकडे आहेत का?” असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर ममतांनी भाजपाविरोधी आघाडीसाठी प्रादेशिक पक्षांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न वाढवले ​​आहेत. या संदर्भात बोलताना ममता बॅनर्जी यांनी, काँग्रेस आता राहिली नसल्याने त्यांना एकत्र ठेवण्यात काही अर्थ नाही. मला वाटते की भाजपाशी लढण्यास इच्छुक असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही, असे म्हटले होते.

काँग्रेसवर विसंबून राहण्यात अर्थ नाही

भाजपाविरोधात देशस्तरीय आघाडी उघडण्यास आपला पाठिंबा आहे. कुणी आम्हाला त्यात घेतले नाही तरी तशा प्रयत्नांना आमचा पाठिंबा राहील, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. यासाठी प्रादेशिक पक्षांना आता काँग्रेसवर अवलंबून राहता कामा नये. काँग्रेसची आताच्या निवडणुकीतील कामगिरी पाहता हे लक्षात घेतले पाहिजे. भाजपाविरोधात ज्यांना उभे ठाकायचे आहे, त्यांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी काँग्रेसवर विसंबून राहण्यात काही अर्थ नाही. पूर्वी काँग्रेसचा आपल्या संघटनेद्वारा सर्व देशावर ताबा होता. पण आता त्यांना यात स्वारस्य नाही, ते त्यांची विश्वासार्हकता गमावत आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If congress didnt exist then people like mamata banerjee would not have been born says congress adhir ranjan chowdhury abn
First published on: 12-03-2022 at 20:05 IST