US lawyer slams air india over delay in ahmedabad plane crash aid : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील पीडित कुटुंबांचा भरपाई मिळवण्यासाठी लढा सुरू आहे. यादरम्यान AI171 विमान दुर्घटनेतील ५६ पीडित कुटुंबांची बाजू मांडणारे अमेरिकेतील वकील माइक अँड्रूज यांनी पीडितांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास होत असलेल्या उशिराबाबत टीका केली आहे. तसेच त्यांनी जर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा जिवंत असते तर अशी ‘नोकरशाही प्रक्रिया’ अस्तित्वातच नसती असेही ते म्हणाले आहेत.

रविवारी एएनआयशी बोलताना अँड्र्यूज यांनी रतन टाटा यांची आठवण काढत, जर ते आज जिवंत असते तर शोकाकुल कुटुंबांना येणाऱ्या अशा अडचणी टळल्या असत्या असे म्हटले आहे. ते म्हणाले की, “अमेरिकेतही, आम्हाला रतन टाटा कोण होते हे माहिती आहे. आम्हाला अमेरिकेत त्यांच्या कामाच्या नैतिकतेबद्दल आणि त्यांच्याकडून नम्र राहण्यावर भर दिला जाणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याबाबत थोडीफार माहिती आहे आणि म्हणूनच आम्हाला माहिती आहे की जर ते आज येथे असते, तर आम्हाला वाटत नाही की कर्मचारी, पीडीत आणि विमानात आणि जमिनीवर असललेल्या लोकांना पैसे मिळण्यास उशीर होईल अशा नोकरशाही प्रक्रियेला सामोरे जावे लागले असते,” असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी एका अडटणीत सापडलेल्या वृद्ध महिलेबद्दल सांगितले, ज्यांचा एकुलता एक मुलगा, जो घरातील कमवता होता, विमान अपघातात दगावला. ही महिला वैद्यकीय उपचारांसाठी मुलावर अवलंबून होती आणि आता यासाठी तिला लोकांकडे मदत मागावी लागत आहे.

आम्ही एका कुटुंबाला भेटलो, ज्यामध्ये एक वृद्ध आई अंथरुणाला खिळलेली आहे आणि ती महिला वैद्यकीय उपचारांसाठी तिच्या मुलाच्या उत्पन्नावर अवलंबून होती. त्याचा आता मृत्यू झाला आहे. त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यांनी अशावेळी काय करावं? जेव्हा तिला मदत करणाऱ्याचा त्याची स्वतःची काहीही चूक ननसताना मृत्यू होतो तेव्हा त्यांनी कसे जगावे हे ठरवण्यासाठी त्यांना जगाच्या दयेवर सोडण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

२६ जुलै रोजी एअर इंडियाने विमान अपघातात मृत्यू झालेल्या २२९ पैकी १४७ प्रवासी आणि जमिनीवर मृत्यू झालेल्या इतर १९ जणांना २५ लाख रुपये अंतर्गत भरपाई म्हणून दिले. ही रक्कम नंतर ठरवल्या जाण्याऱ्या अंतिम भरपाईशी जुळवून घेतली जाईल.

टाटा समुहाने पीडितांच्या आठवणीत ‘द एआय-१७१ मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट’ची स्थापना केली आहे. याबरोबरच या ट्रस्टने प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना १ कोटींची मदत देण्याचे मान्य केले आहे. तसेच बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी देखील यांच्याकडून मदत केली जाणार आहे. तसेच दुर्घटनेवेळी मदत करणारे, वैद्यकीय सेवा पुरवणारे आणि अपघातामुळे नुकसाण झालेल्या इतर मदत कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.

२६० जणांचा मृत्यू

१२ जून रोजी, एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ फ्लाइट AI१७१ हे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत २२९ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि जमिनीवर १९ जण अशा एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला.