Crime News: दिल्लीतील द्वारका येथे एका ३६ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा तपास करत असताना, पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकर यांच्यातील इन्स्टाग्राम चॅट्स सापडल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये त्यांनी हत्येचा कट आखल्याचे पुरावे आढळले आहेत.
३५ वर्षीय सुष्मिता या महिलेचे राहुल (२४) नावाच्या नातेवाईकाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे आणि तिने पती करण देव याची हत्या करण्याचा कट रचला होता. त्यांनी करणला झोपेच्या गोळ्या देऊन अंमली पदार्थ पाजले आणि १३ जुलै रोजी त्याला वीजेचा धक्का देऊन ठार मारले, असा खुलासा शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्याने केला.
चौकशीत असे समोर आले की, दोघांनी करणला रात्रीच्या जेवणात १५ झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या गोळ्यांमुळे मृत्यू होण्यास किती वेळ लागतो, याबद्दल त्यांनी गुगलवर सर्च केल्याचेही निष्पन्न झाले.
“औषध घेतल्यानंतर मृत्यू होण्यास किती वेळ लागतो ते एकदा तपास. त्याला जेवण करून तीन तास झाले आहेत. उलट्या झाल्या नाहीत आणि अजून मृत्यूही झालेला नाही”, असे सुष्मिताने प्रियकर राहुलला केलेल्या एका इन्स्टाग्राम मेसेजमध्ये म्हटले आहे.
यावर प्रियकराने उत्तर दिले की, “जर तुला काही झाले आहे कळत नसेल, तर त्याला शॉक दे.” यानंतर सुष्मिताने राहुलला विचारले की, पती करणला विजेचा धक्का देण्यासाठी कसे बांधायचे. यावर राहुलने तिला टेप वापरण्याचा सल्ला दिला.
दुसऱ्या एका मेसेजमध्ये ती म्हणते की, पती करण देव हळूहळू श्वास घेत आहे. यावर राहुल तिला आणखी गोळ्या देण्यास सांगतो. सुष्मिता उत्तर देते, “मी त्याचे तोंड उघडू शकत नाही. मी पाणी ओतू शकते, पण औषध देऊ शकत नाही. तू इथे ये, कदाचित आपण एकत्र मिळून त्याला त्या देऊ शकेन.”
अखेर देवचा श्वास थांबतो. त्यानंतर सुष्मिता पती करणला रुग्णालयात घेऊन जाते, जिथे पोहोचताच त्याला मृत घोषित करण्यात येते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुष्मिताने रुग्णालयात पती करण देवला विजेचा धक्का बसल्याचा दावा केला होता.
चौकशीदरम्यान आणि शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वी करणचा धाकटा भाऊ कुणाल याने १६ जुलै रोजी पोलिसांशी संपर्क साधला आणि राहुल व सुष्मिता यांच्यातील इन्स्टाग्राम चॅट्सचा हवाला देत आपल्या भावाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांना सुष्मिता आणि प्रियकर राहुलच्या जबाबांत विसंगती आढळून आली. त्यानंतर शनिवारी पहाटे दोघांनाही अटक करण्यात आली.
महिलेने पोलिसांना सांगितले की, करवाचौथच्या एक दिवस आधी तिच्या पतीने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली होती. तो अनेकदा तिच्याकडून पैसेही मागायचा, त्यामुळे ती चिडली होती.