पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आसिफ अली झरदारी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. झरदारी यांनी दहशतवाद्यांना माझ्या हत्येसाठी पैसे दिले आहेत. उद्या मला काही झालं तर त्याची जबाबदारी ही झरदारी यांच्यावर असेल असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. माझी हत्या करण्याचे दोन अपयशी प्रयत्न आसिफ अली झरदारी यांनी करून झाले आहेत असाही आरोप इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी लाहोर या ठिकाणी असलेल्या जमाँ पार्क निवासस्थानातून व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी त्यांनी आसिफ अली झरदारींवर आरोप केले आहेत.

काय म्हटलं आहे इम्रान खान यांनी?

“मी तुम्हाला ही माहिती देऊ इच्छितो कारण उद्या मला काही झालं तर लोकांना हे समजलं पाहिजे की माझ्या हत्येमागे कोण आहे. तसंच माझ्या हत्येमागे आसिफ अली झरदारी आहेत त्यांना जनता कधीही माफ करणार नाही हेदेखील मला माहित आहे” असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे. आसिफ अली झरदारींकडे भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेला भरपूर पैसा आहे. सरकारकडून पैसे लुटायचे आणि निवडणूक जिंकण्यासाठी ते पैसे वापरायचे हे यांचे उद्योग आहेत असाही आरोप खान यांनी केला आहे.

इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेरचा बंदोबस्त हटवला

पाकिस्तानच्या एका न्यूज एजन्सीने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर असलेले २७५ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त हटवण्यात आला आहे. याबाबतही इम्रान खान यांनी माहिती दिली आहे असंही या न्यूज एजन्सीने दिली आहे. तसंच इम्रान खान म्हणाले की मी एका सार्वजनिक रॅलीमध्ये गेलो होतो तेव्हा चार अज्ञातांनी मला मारण्याचा कट आखला होता. त्यानंतर धर्माच्या नावे मला संपवण्यासाठी एक प्लान बी देखील आखण्यात आला होता असंही इम्रान खान यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३ नोव्हेंबरला इम्रान खान यांच्यावर हल्ला

३ नोव्हेंबरला इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी इम्रान खान यांच्या उजव्या पायावर गोळी लागली होती. वझिराबादमध्ये ही घटना घडली होती. त्यावेळी इम्रान खान यांनी या कटासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ, मंत्री राणा सनाउल्लाह आणि आयएसआयवर आरोप केले होते. आता त्यांनी आपली हत्या झाली तर आसिफ अली झरदारी जबाबदार असतील असं म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.