अरुणाचल प्रदेशवरून भारत आणि चीन यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. चीनने अरुणाचल प्रदेश राज्यावर दावा ठोकला आहे. परंतु, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं केंद्राने निक्षूण सांगितलं आहे. आता यावरून केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही चीनला सुनावलं आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अरुणाचल प्रदेशचं नाव बदलल्याने कोणताही परिणाम होणार नाही. तसंच, ईशान्य राज्य भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहील, असंही ते म्हणाले. जयशंकर सोमवारी इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि सदर्न गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांनी सादर केलेल्या कॉर्पोरेट समिट २०२४ मध्ये बोलत होते.

“आज मी तुमच्या घराचे नाव बदलले तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश हे भारताचे राज्य होते, आहे आणि राहील. नाव बदलण्याचा कोणताही परिणाम होत नाही”, असं ते म्हणाले. “आमचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहेत”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा >> अरुणाचलवरून चीनची पुन्हा कुरापत; भारताने दावा फेटाळल्यानंतरही भूमिकेत बदल नाही

अरुणाचल प्रदेशवर चीनचा दावा

मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरूणाचल प्रदेशाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी तवांग येथील सेला टनेलचं उद्घाटन केलं होतं. रणनीतीच्या दृष्टीने हे मोठं पाऊल मानलं गेलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरूणाचल प्रदेशाच्या दौऱ्यानंतर चीनने हे पोकळ दावे केले की अरूणाचल प्रदेश हा आमचाच आहे. चीनच्या पराराष्ट्र प्रवक्त्यांनी तर असंही म्हटलं होतं की जिजांग चा दक्षिणी भाग ज्याला आम्ही तिबेट हे नाव दिलं आहे तो संपूर्ण भूभाग चीनचा आहे. भारताने याचा विरोध केला आणि निषेध नोंदवला होता.

चीनचा अरुणाचल प्रदेशवरील दावा ‘मूर्खपणाचा’ व ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगून भारताने तो फेटाळला असला, तरी अरुणाचल प्रदेश हा आपल्या भूप्रदेशाचा भाग असल्याचा आपला दावा चीनने कायम राखला. चीन अरुणाचल प्रदेशवर वारंवार करत असलेला दावा ‘हास्यास्पद’ असल्याचे, तसेच हे सीमावर्ती राज्य ‘भारताचा नैसर्गिक भाग’ असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याआधीही ठासून सांगितले होते.