scorecardresearch

UP Election: “सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू;” अखिलेश यादवांची मोठी घोषणा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे.

Cant compete with BJP in digital rallies Election Commission should help Akhilesh Yadav reaction
(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे आणखी एका भाजपा नेत्याने समाजवादी पार्टीत प्रवेश केला. माजी मंत्री दारा सिंह चौहान यांचं अखिलेश यादव यांनी पक्षात स्वागत केलंय.

नुकतेच उत्तर प्रदेश सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्री पदाचा राजीनामा देणारे दारा सिंह चौहान आणि भाजपाचे सहयोगी ‘अपना दल (सोनेलाल)’चे आमदार डॉ. आरके वर्मा यांनी रविवारी त्यांच्या समर्थकांसह समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपा मुख्यालयात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल यांनी दारा सिंह चौहान आणि प्रतापगड जिल्ह्याचे आमदार आरके वर्मा यांच्या समर्थकांसह पक्षात सामील होण्याची घोषणा केली.

अखिलेश यादवांचा योगींना टोला…

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या नावांच्या यादीत योगी आदित्यनाथ यांना पक्षाने गोरखपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. यावरून समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी योगींना टोला लगावला होता. “कधी कधी ते म्हणायचे की ते अयोध्येतून लढतील, मथुरेतून लढतील, प्रयागराजमधून लढतील… की भाजपाने निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांना आधीच गोरखपूरला पाठवलं, हे मला आवडलं. आता योगींनी तिथेच राहावे, तिथून येण्याची गरज नाही,” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If we come in power caste census will be done in three month says akhilesh yadav hrc