Keir Starmer : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले. त्या निर्णयांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यांचा देखील समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कारवाईला सुरूवात केल्यानंतर लाखो बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार केलं. दरम्यान, अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता आणखी एका देशाने बेकायदेशीर स्थलांतरितांच्या विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘जर बेकायदेशीर स्थलांतरितांनी देशात प्रवेश करण्याचा गुन्हा केला तर त्यांना शक्य तितक्या लवकर देशातून हद्दपार केलं जाईल. बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करणाऱ्यांना अटक करून परत पाठवलं जाईल’, असं कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या संदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे की, “जर तुम्ही या देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केला तर तुम्हाला ताब्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला परत पाठवलं जाईल. तुम्ही या देशात बेकायदेशीरपणे येण्याचा गुन्हा केला तर आम्ही तुम्हाला शक्य तितक्या लवकर हद्दपार करू”, असं कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे.

कीर स्टार्मर म्हणाले की, “परदेशी गुन्हेगार खूप दिवसांपासून ब्रिटनच्या इमिग्रेशन व्यवस्थेचा गैरफायदा घेत आहेत. त्यांच्या अपीलांवर प्रक्रिया सुरू असताना ते अनेक महिने किंवा अगदी वर्षभर देखील यूकेमध्ये राहिले आहेत. मात्र, आता हे संपणार आहे. आता जर परदेशी नागरिकांनी कायदा मोडला तर त्यांना लवकरात लवकर हद्दपार करण्यात येणार आहे”, असा इशारा कीर स्टार्मर यांनी दिला आहे.

तसेच कीर स्टार्मर यांनी असंही स्पष्ट केलं की, “यूकेच्या इमिग्रेशन सिस्टमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेकायदेशीर कामगारांचंही आम्ही समर्थन करणार नाहीत. कारण तसं केल्यास नियमांचे पालन करणाऱ्या लोकांवर हा अन्याय असेल. तसेच आमच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आम्ही कधीही थांबणार नाहीत. आमचं सरकार देशाच्या सीमा सुरक्षित करत आहे”, असंही कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे.