Farooq Abdullah on Pakistan: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्पष्ट केले असले तरी पाकिस्तानने हे मान्य केलेले नाही. यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले की, आम्हाला दहशतवाद मान्य नाही. दहशतवादामुळे दोन्ही देशांचे नुकसान होत आहे.
त्यांना हे समजायला हवं…
माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतादावर बोलताना म्हटले की, दहशतवाद आम्हाला मान्य नाही, हे आम्ही अनेकदा बोललो आहोत. दहशतवादामुळे दोन्ही देशांचे नुकसान होत आहे, हे त्यांना समजायला हवं. मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा त्यांनी हात झटकले. पण नंतर त्यांनीच हल्ला केल्याचे सिद्ध झाले. पठाणकोट, उरी आणि इतर ठिकाणीही त्यांनीच हल्ले केले होते. हे सिद्ध झालेले आहे.
“कारगिल युद्धाच्या वेळी मी जम्मू आणि काश्मीरचा मुख्यमंत्री होतो. तेव्हाही पाकिस्तानने अशीच नकारघंटा लावली होती. मात्र जेव्हा ते युद्ध हरू लागले तेव्हा त्यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडे धाव घेतली आणि दोन आठवड्यांचा वेळ मागितला. आता वेळ आली आहे. जर तुम्हाला मैत्रीचे संबंध ठेवायचे असेल तर असले प्रकार करू नयेत. जर तुम्हाला शत्रूत्वच हवे असेल तर मग आम्हीही तयार आहोत”, अशा इशारा फारूख अब्दुल्ला यांनी दिला.
दरम्यान पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेपत्ता आहेत, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. यासाठी त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर आता फारूख अब्दुल्ला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात पंतप्रधान मोदींचा पेहराव दिसत आहे. पण त्यांचे शरीर दिसत नाही. ‘जबाबदारीच्या वेळी बेपत्ता’, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले होते. या फोटोवर गदारोळ माजल्यानंतर काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून सदर पोस्ट हटविण्यात आली आहे. या पोस्टचा उल्लेख करत फारूख अब्दुल्ला म्हणाले की, पंतप्रधान मोदी बेपत्ता झालेले नाहीत. ते इथेच दिल्लीत आहेत.