एक्स्प्रेस वृत्त, नवी दिल्ली : शरद पवार यांना यापूर्वी भाजपशी सलगी करण्यात संकोच वाटला नव्हता, मुलीच्या सल्ल्यानेच ते सर्व कृती करतात आणि त्यांनी आजपर्यंत आपला निर्णय प्रत्येकावर लादला आहे, या तीन कारणांमुळेच आपण त्यांची साथ सोडून अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी दिले.

शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले आणि आता अजित पवार यांच्याशी निष्ठा वाहिलेले पटेल यांनी आपली भूमिका ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीद्वारे स्पष्टपणे मांडली. तुम्ही सत्तेत असाल तरच पक्ष समर्थक, पक्ष सदस्य आणि आमदारांची कामे होऊ शकतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भवितव्य पणाला लागल्याचे नमूद करून पटेल म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस एकेकाळी काँग्रेसबरोबर सत्तेत वाटेकरी झाला होता; त्यानंतर राष्ट्रवादीने शिवसेनेशीही युती केली. परंतु वयाच्या ८२व्या वर्षी शरद पवार यांनी आपल्या मुलीच्या हितासाठी पक्षात अत्यंत लोकप्रिय असलेल्या अजित पवार यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या या कृतीमुळे खूप संभ्रम निर्माण झाला होता.’’

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपला दोष नसतानाही आपल्याला खलनायक ठरवले गेले होते, असे अजित पवारांनीच म्हटले होते, असेही पटेल यांनी सांगितले. अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांवरील सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खटल्यांबाबत विचारले असता पटेल म्हणाले, ‘‘केंद्रीय संस्थांना माझ्याविरोधात काहीही सापडले नाही. ईडी हे एक अंतिम कारण आहे. मात्र, ईडी प्रकरणांचा पक्ष कार्यकर्त्यांशी काहीही संबंध नाही. कार्यकर्त्यांना फक्त त्यांचे काम व्हावे, अशी अपेक्षा असते आणि तुम्ही सत्तेत असता तेव्हाच ते होऊ शकते.’’

तपास संस्थांच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे म्हणून तुम्ही भाजपला साथ दिली का, असे विचारले असता, ‘‘शरद पवार यांनीही यापूर्वी भाजपशी अनेकदा सलगी केली होती,’’ असा दावा पटेल यांनी केला. ते म्हणाले, ‘‘२०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ केला होता. २०१९मध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाही शरद पवारांना त्याची पूर्ण माहिती होती. शरद पवारांनीच तेव्हा आपण भाजपशी चर्चा करीत असल्याचे सांगितले होते, हे तुम्हाला आठवत असेल. तसेच २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अनेक आमदारांना सुरत आणि गुवाहाटी येथे घेऊन गेले, तेव्हा शरद पवारांनी मला, जयंत पाटील आणि अजित पवार यांना आपण भाजपशी युती करू शकतो का ते पाहण्यास सांगितले होते. मात्र तेव्हा खूपच उशीर झाला होता आणि शिंदे भाजपशी युती करून मोकळे झाले होते.’’

अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी निवासस्थानी ३० जून रोजीच झालेल्या बैठकीत ४१ आमदारांच्या स्वाक्षरीची प्रतिज्ञापत्रे तयार होती, असे पटेल म्हणाले. त्याच दिवशी, आम्ही निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सुपूर्द केली. त्यात अजित पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवडून आल्याचे ४१ आमदारांच्या स्वाक्षरी असलेले प्रतिज्ञापत्रही होते. तसेच आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करतो, हे अजित पवार यांचे प्रतिज्ञापत्रही त्यात होते, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

मोदींविरुद्ध लढण्याच्या फक्त वल्गना

काही आठवडय़ांपूर्वी विरोधी पक्षांच्या पाटण्यातील बैठकीला पटेल शरद पवार यांच्याबरोबर उपस्थित होते, याची आठवण करून दिली असता ते म्हणाले, की पाटण्यातील चित्र प्रेरक नव्हते. आपण पंतप्रधान मोदी यांच्याशी लढू असे विरोधी पक्ष म्हणत आहेत, मात्र कोण आणि कशाप्रकारे, याची कोणतीही योजना त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांच्या एकजुटीतून आत्मविश्वास प्रतीत होत नाही.

शरद पवार यांचीही भाजपशी सलगी

शरद पवारांच्या भूमिकेमुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक गोंधळले होते, असा दावा पटेल यांनी केला. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी वैचारिक तडजोड केल्याच्या कथित आरोपाशी त्यांनी असहमती दर्शवली. ते म्हणाले, ‘‘शरद पवार यांनी २०१४ पासून किमान तीनदा भाजपशी सलगी केली आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांनी शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. ते तत्त्वनिष्ठ विरोधी पक्ष म्हणून राहू शकले असते, पण त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेशी युती केली.’’