आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला २३ मार्च रोजी सायंकाळी ताब्यात घेतलं आहे. हा विद्यार्थी आयएसआयएस या दहशतवादी गटात सामील होण्यासाठी जात होता. परंतु, त्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. दि हिंदूने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आयएसआयएस इंडियाचा प्रमुख हरीश फारुकी उर्फ हरीश अजमल फाऊखी आणि त्याचा सहकारी अनुराग सिंग उर्फ रेहान यांना धउबरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर चारच दिवसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं.

“आयएसआयएसचं समर्थन करणाऱ्या एका विद्यार्थ्याला आयएसआयएसमध्ये सामील होण्याआधीच ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील कायदेशीर पाठपुरावा केला जाईल”, असं पोलीस महासंचालक जी.पी सिंग यांनी एक्स वर पोस्ट केले आहे.

संबंधित मुलानेच पोलिसांना ईमेल केला होता. या ईमेलमध्ये त्याने आयएसआयएसमध्ये सामील होत असल्याचं सांगितलं. हा ईमेल मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सुरुवातीला या ईमेलच्या सत्यतेबाबत खात्री करून घेतली. त्यानंतर त्यांनी आयआयटी गुवाहाटीच्या प्रशासनाशी संपर्क साधला. परंतु, तोपर्यंत संबंधित विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचा मोबाईलही बंद लागत होता, असं अतिरिक्त पोलीस अधिक्षक कुमार पाठक यांनी सांगितलं.

मुलाला शोधण्यासाठी स्थानिकांची मदत

त्यामुळे त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांची मदत घेतली. तपासातून शनिवारी सायंकाळी गुवाहाटीपासून सुमारे ३० किमी अंतर असलेल्या हाजो परिसरातून त्याला पकडले. “प्राथमिक चौकशीनंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आले आहे. आम्ही ईमेलच्या हेतूची पडताळणी करत आहोत”, असं अतिरिक्त पोलीस अधिक्षक कुमार पाठक म्हणाले.

हेही वाचा >> धक्कादायक: सद्गुरु यांच्या इशा फाऊंडेशनमधून ६ लोक बेपत्ता; पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हॉटेलच्या खोलीत सापडला दहशतवादी ध्वज

विद्यार्थ्याच्या वसतिगृहाच्या खोलीत आयएसआयएससारखाच एक ध्वज सापडला आहे. तो ध्वज विशेष यंत्रणांकडे पडताळणीकरता पाठवण्यात आला आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. “आम्ही जप्त केलेल्या वस्तू तपासत आहोत. आम्ही ईमेल पाठवण्याच्या हेतूची चौकशी करत आहोत. विद्यार्थ्याने काही तपशील दिले आहेत, परंतु आम्ही आता आणखी काही उघड करू शकत नाही”, असंही पुढे म्हणाले.