पीटीआय, न्यूयॉर्क/वॉशिंग्टन
अमेरिकेने भारतातील वस्तूंवर लागू केलेल्या २५ टक्के आयातशुल्काच्या निर्णयाची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. भारतासह जगभरामध्ये परस्परसमान करदेखील गुरुवारपासून लागू झाले.
अमेरिकेमध्ये बुधवारी मध्यरात्री १२ वाजता ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर पोस्ट करून म्हटले, ‘आता मध्यरात्र आहे. आयातशुल्काद्वारे अब्जावधी डॉलर आता अमेरिकेमध्ये येऊ लागतील. परस्परसमान कर मध्यरात्रीपासून लागू होतील. अमेरिकेचा अनेक वर्षे फायदा घेणाऱ्या देशांतून आता अब्जावधी डॉलर अमेरिकेमध्ये येऊ लागतील. अमेरिकेच्या मोठेपणाला आता केवळ कट्टरतावादी डावे असलेले असे न्यायालयच रोखू शकेल. त्यांना आपला देश अपयशी झालेला पाहायचा आहे.’
या देशांवर इतके आयातशुल्क
– जपान, युरोपीय संघ, दक्षिण कोरिया – १५ टक्के
– लाओस, म्यानमार – ४० टक्के
– पाकिस्तान – १९ टक्के
– श्रीलंका – २० टक्के
– ब्रिटन – १० टक्के
– तैवान, व्हिएतनाम, बांगलादेश – २० टक्के
भारत अमेरिकेला लागणाऱ्या एकूण औषधांपैकी निम्मी जेनेरिक औषधे पुरवतो. या करामुळे औषधांच्या किमती वाढतील. मसाले, दिवाळीचे कपडे या साऱ्यांच्या किमती वाढतील. कपडे आणि चपलांच्या किमती ४० टक्क्यांनी वाढतील. या करवाढीला विरोध आहे. ट्रम्प यांनी चीनच्या करांना ९० दिवसांची स्थगिती दिली आहे आणि भारताला, लोकशाहीवादी देशाला लक्ष्य केले आहे. भारत-अमेरिका व्यापारी भागीदारीला यामुळे धोका आहे. – अजय भुटोडिया, भारतीय-अमेरिकी कम्युनिटी नेते आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचे सल्लागार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेले ५० टक्के आयातशुल्क हे परराष्ट्र धोरणासमोरचे मोठे संकट असून, मोदी सरकारला ते कसे हाताळावे, हे कळत नाही. – मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस</p>
‘चीन करतो, साधारण तितकीच भारताची रशियातून तेलखरेदी’
न्यूयॉर्क/वॉशिंग्टनः ‘रशियातून तेलखरेदी चीन जितकी करतो, त्याच्या अगदी समीप भारत आहे. त्यामुळे त्यांच्यावर ५० टक्के आयातशुल्क लागू केले आहे. तुम्हाला इतर दुय्यम निर्बंधही येत्या काळात दिसतील,’ असे ट्रम्प म्हणाले. भारताच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मोघम उत्तरे दिली. युक्रेन-रशिया युद्ध थांबले, तर भारतावरील आयातशुल्क कमी करणार का, यावर त्यांनी ‘आम्ही त्यावर नंतर निर्णय घेऊ’ असे उत्तर दिले. चीनही रशियातून तेलखरेदी करतो, असे विचारले असता, ‘ते ठीक आहे,’ असे ते म्हणाले.
‘छोट्या उद्योगांचे मरण’
अमेरिकेच्या आयातशुल्कवाढीच्या निर्णयानंतर कपड्यांची निर्यात करणाऱ्या ‘एईपीसी’ संघटनेने गुरुवारी तत्काळ सरकारी मदतीची मागणी केली आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ‘एईपीसी’चे अध्यक्ष सुधीर सेखरी यांनी निर्यात उद्योगाला यामुळे मोठा धोका पोहोचल्याचे म्हटले आहे. हा धोका उद्योग सहन करू शकणार नाही, असे ते म्हणाले. अमेरिकेत भारताचा ३३ टक्के कपड्यांचा व्यापार चालतो.