पीटीआय, न्यूयॉर्क
‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या बेकायदा आणि हिंसक कृत्यांचे सविस्तर तपशील दिले नाहीत, तर हार्वर्ड विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची पात्रता रद्द करता येईल,’ असा इशारा अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाला दिला आहे.
अमेरिकेच्या गृहमंत्री क्रिस्ती नोएम यांनी विद्यापीठाला खरमरीत शब्दांत पत्र लिहिले असून, ३० एप्रिलपर्यंत परकीय विद्यार्थ्यांच्या बेकायदा आणि हिंसक कृत्यांचे सविस्तर तपशील मागितले आहेत. तपशील दिले नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आदानप्रदानाचे प्रमाणपत्र (स्टुडंट अँड एक्स्चेंज व्हिजिटर प्रोग्रॅम सर्टिफिकेशन) रद्द केले जाईल, असे नोएम यांनी म्हटले आहे. नोएम यांनी विद्यापीठाला दोन प्रकारांत मिळणारे २७ लाख डॉलरचे अनुदान बंद करण्याचीही घोषणा केली.
‘‘हार्वर्ड’ने ज्यू-विरोधी चळवळीसमोर नांगी टाकली आहे. त्यामागे तेथील कणा नसलेले नेतृत्व आहे. त्यामुळे अतिरेक्यांच्या दंगलींना चालना मिळत असून, राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. विद्यापीठाने नीट पडताळणी केली नाही आणि तपशील देण्याची गरज त्यांना वाटली नाही, तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांना प्रवेश देता येणार नाही.’ असे पत्रात म्हटले आहे.