करोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर पहिला डोस कोणाला द्यायचा? प्राधान्यक्रम कसा असेल? यावरुन विविध अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारमधील मंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असा प्राधान्यक्रम असेल, असे संकेत दिले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लस व्यवस्थापनासंदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर महत्त्वाची बैठक होत आहे.

दरम्यान करोनाच्या संकटाचा थेट सामना करणारे आरोग्य क्षेत्रातील एक कोटी कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस दिला जाईल. हे कर्मचारी कोण असतील? ते निश्चित करण्यात आले आहे. पहिली जी लस उपलब्ध होईल, त्याचा डोस या एक कोटी कर्मचाऱ्यांना दिला जाईल असे सरकारमधील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

लशीसाठी पहिल्या प्राधान्य गटाचा डाटाबेस तयार करण्याचे काम खूप पुढे गेले आहे, असे लस व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ गटातील सूत्रांनी सांगितले. लशीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पहिला डोस मिळेल. “आम्हाला राज्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सर्व राज्यातील ९२ टक्के रुग्णालयांनी डाटा दिला आहे. खासगी क्षेत्रातील ५६ टक्के रुग्णालयांनी डाटा दिला आहे. आम्ही अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये आहोत” अशी माहिती सूत्रांनी दिली.