महाराष्ट्रातील तुरूंग प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या योगा परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या बलात्कार, खून आणि गैरव्यवहार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षेत सूट देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर न्यायालयाने २०१२ मध्ये शितल कावळे याला बलात्काराच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले होते. येत्या सप्टेंबर महिन्यात तो तुरूंगातून सुटणार होता. मात्र, शिक्षेचा कालावधी संपण्याच्या ४० दिवस आधीच त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र तुरूंग प्रशासन विभागाकडून घेण्यात आलेल्या योग परीक्षेत शितल कावळे याने पहिला क्रमांक मिळवला होता. हाच प्रकार औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील सचिन पुंड  आणि बाळू पुंड यांच्याबाबत घडलेला आहे. या दोघांना प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यासाठी सात वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
शितल कावळे यांनी १०० गुणांच्या योगा परिक्षेत डिस्टिक्‍शन प्राप्त केले होते. त्यामुळे त्याची ४० दिवसांची शिक्षा माफ करण्यात आल्याची माहिती राज्य तुरूंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. तर सचिन आणि बाळू पुंड यांना १८ जुलै रोजी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातून सोडण्यात आले. या दोघांची अनुक्रमे ४० आणि ३० दिवसांची शिक्षा माफ करण्यात आलेली आहे. सचिनने योगा परीक्षेत ८३ आणि बाळुने ७० गुण मिळवले होते. रामदेव बाबा यांच्या पतांजली योगपीठाकडून ही परीक्षा पहिल्यांदा मे ते जून या कालावधीत घेण्यात आली होती. या परिक्षेच्या निकालानंतर नागपूर आणि औरंगाबाद कारागृहातील प्रत्येकी आठ कैद्यांची शिक्षा कमी करण्यात आली. यापैकी दोघांना प्राणघातक हल्ला, चौघांना सदोष मनुष्यवध, एका कैद्याला बलात्कार आणि एकाला गैरव्यवहाराच्या गुन्ह्याखाली शिक्षा सुनाविण्यात आली होती.