राजस्थानात सत्ताधारी काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्का बसला आहे. चार टप्प्यात झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा बाजी मारेल, असे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिकर जिल्ह्यात हिंसाचाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

भाजपाने पंचायत समितीच्या १८३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला १७१८ जागा जिंकता आल्या आहेत. ४०५० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. २२२ पंचायत समित्यांमध्ये एकूण ४३७१ जागा आहेत. जिल्हा परिषदेतही अशीच स्थिती आहे. जिल्हा परिषदेत ५८० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपाने ३१२ तर काँग्रेसचे उमेदवार २३९ जागांवर विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत एकूण ६३६ जागा आहेत. ग्रामीण भागात पकड असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेससाठी हा एक झटका आहे.

पंचायत समितीमध्ये ४२२ अपक्ष आणि ५६ राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सीपीएमने सुद्धा १६ जागा जिंकल्या आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत आता अपक्षांची भूमिका महत्त्वाची राहिल. हा निकाल म्हणजे गरीब, शेतकरी आणि मजुरांचा मोदी सरकारवरील विश्वास आहे असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वीच सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंड पुकारले होते. त्यावेळी सरकाराला धोका निर्माण झाला होता. पण कसेबसे करुन त्यावेळी पक्षाने हे बंड शमवले. राजस्थानचा आताचा निकाल म्हणजे गेहलोत यांच्यासाठी एक झटका आहे. राजस्थानातील भाजपाच्या प्रमुख नेत्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी विजयाबद्दल पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.