उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या पक्षातून अनेक नेते सध्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताहेत. मतांचे ध्रुवीकरण म्हणा किंवा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा करिश्मा म्हणा, पण समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय लोकदल या सर्वच पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱयांची पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये रिघच लागल्यासारखी स्थिती आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक नेत्यांनी आपल्या समर्थकांसह याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुझफ्फरनगरमधील दंगलींनंतर अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे नेते बाबूलाल चौधरी यांनी गाझियाबादमध्ये भाजपत प्रवेश केला. चौधरी यांनी मुलायमसिंह मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात काम केले होते. या प्रवेशानंतर ते म्हणाले, मुझफ्फरनगरमधील दंगलींनंतर उत्तर प्रदेशातील जाट समाज हा भाजपच्या दिशेने आकृष्ट झाला आहे. त्यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात पक्षाने जाट समाजातील नेत्यांना प्राधान्य दिले पाहिजे. बाबूलाल चौधरी यांनी लोकसभेसाठी मथुरामधून भाजपचे तिकीट मागितले आहे.
राष्ट्रीय लोकदलाचे छाप्रौलीमधील माजी आमदार गजेंद्र मुन्ना चौधरी यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. बिजनौरमधील माजी खासदार मुन्शीराम पाल यांनीही ६ ऑक्टोबर रोजीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.