राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगलीच धोबीपछाड दिली आहे. यामुळे येथील आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी मोठी संघर्षाची ठरणार आहे. कारण ही पोटनिवडणूक आगामी निवडणूकीचा ट्रेलर मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलवरच्या जागेवर काँग्रेसचे डॉ. करणसिंह यादव यांनी भाजपचा उमेदवार डॉ. जसवंतसिंह यादव यांना धोबीपछाड दिली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला ५,२०,४३४ तर भाजपच्या उमेदवाराला ३,७५,५२० मते मिळाली आहेत. राजस्थानात सध्या भाजपची सत्ता असून ही जागाही यापूर्वी भाजपकडे होती.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, अलवरमध्ये भाजपच्या हार मागे कथित गोरक्षकांचा उच्छाद मानला जात आहे. यामुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होण्यास मदत झाली. दूसरे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वतः जसवंत सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य. ‘तुम्ही हिंदू असाल तर मला मत द्या, मुस्लिम असाल तर काँग्रेसच्या उमेदवाराला मत द्या’ असे ते म्हणाले होते. हा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या जागेवर एकूण ११ उमेदवारांपैकी दोन उमेदवार मुस्लिम होते. मात्र, तरीही मुस्लिमांनी एकत्रितपणे काँग्रेसला भरभरून मत दिले आहे. या जागेवर भाजपचे महंत चांदनाथ यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

तर दुसरीकडे अजमेरच्या निवडणूकीत अद्याप अंतिम निकाल हाती येणे बाकी आहे. मात्र, या ठिकाणी भाजप बरीच पिछाडीवर असून काँग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. येथे काँग्रेसच्या डॉ. रघू शर्मा यांची थेट लढत भाजपचे उमेदवार रामस्वरूप लांबा यांच्याबरोबर होत आहे.

दरम्यान, राजस्थानातील मांडलगढ येथील विधानसभेच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने विजय मिळवला आहे. येथे काँग्रसचे उमेदवार विवेक धाकड यांनी भाजपचे उमेदवार शक्ती सिंह हाडा यांना पराभूत केले आहे. धाकड यांना येथे ७०,१४६ मते मिळाली तर सिंह यांना ५७,१७० मते मिळाले आहेत.
२९ जानेवारी रोजी या तीनही जागांवर मतदान घेण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the by poll elections of rajasthan the bjp will wash away by congress
First published on: 01-02-2018 at 16:00 IST