scorecardresearch

अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ

१ एप्रिलपासून ठराविक अल्पबचत योजनांवर बचतदारांना ०.१० ते ०.७० टक्के अधिक व्याज मिळवता येणार आहे.

dv Increase in interest rate
अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ

पीटीआय, नवी दिल्ली : १ एप्रिलपासून ठराविक अल्पबचत योजनांवर बचतदारांना ०.१० ते ०.७० टक्के अधिक व्याज मिळवता येणार आहे. सरकारने ३० जून २०२३ या तिमाहीसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदरांनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर आठ टक्क्यांवरून ८.२ टक्के, तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर सात टक्क्यांवरून ७.७ टक्के करण्यात आला. मात्र, लोकप्रिय सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदरात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कोणताही बदल केलेला नाही. 

शनिवारपासून (१ एप्रिल) लागू होणाऱ्या सुधारित दरांनुसार, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (एनएससी) व्याजदरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. त्यावर आता ७ टक्क्यांऐवजी ७.७० टक्के व्याज मिळणार आहे. मुलींसाठी असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर ८ टक्के व्याज मिळणार आहे. याआधीच्या तिमाहीत त्यावर ७.६ टक्के व्याज देय होते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि किसान विकास पत्र यावरील व्याजदर अनुक्रमे ८.२ टक्के (८ टक्क्यांवरून) आणि ७.५ टक्के (७.२ टक्क्यांवरून) असेल.

किसान विकास पत्राचा आता परिपक्वता कालावधी १२० महिन्यांच्या तुलनेत ११५ महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. गेल्या तिमाहीतही विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती. तिमाहीगणिक बदलत्या बाजारस्थितीनुसार व्याजाचे दर केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून पुन:निर्धारीत केले जातात.

पोस्टाच्या एका वर्षांच्या मुदत ठेवींवर आता ६.८ टक्के व्याज मिळणार आहे. त्यावर आधी ६.६ टक्के व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर अनुक्रमे ६.९ टक्के, ७ टक्के आणि ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. मासिक उत्पन्न खात्यावरील (एमआयएस) व्याजदरात ०.३० टक्के वाढ करण्यात आली असून, त्यावर ७.४ टक्के दराने व्याजदर लागू होईल. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील (पीपीएफ) गुंतवणुकीवरील ७.१ टक्के आणि बँकेतील बचत खात्यातील शिलकीवर ४ टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने मे २०२२ पासून कर्जाच्या व्याजदरात एकंदर अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बँकांनी ठेवींवर आकर्षक व्याजदर देण्यास सुरुवात केली आहे. हे पाहता अपेक्षेप्रमाणे अल्पबचत योजनांवरील व्याजदरात स्पर्धात्मक वाढीचे पाऊल टाकण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या