वृत्तसंस्था, नवी दिल्ली

महागाईचा भडका उडाला असून, भाज्या आणि इतर खाद्यान्नांच्या किंमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये ७.४४ टक्क्यांवर म्हणजेच १५ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. पाच महिन्यांनंतर दर पुन्हा रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने ‘चिंताजनक’ अशा सहा टक्क्यांच्या पातळीपुढे उसळल्यामुळे पुन्हा एकदा व्याजदर वाढीची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारलेला किरकोळ महागाई दर जूनमध्ये तो ४.८७ टक्क्यांवर होता आणि मागील वर्षी जुलै महिन्यात तो ६.७१ टक्के होता. मागील वर्षी एप्रिलमध्ये नोंदविली गेलेला ७.७९ टक्के ही या महागाई दराची अलिकडची उच्चांकी पातळी होती. जुलैमध्ये कडाडलेला टॉमेटो आणि त्याचे अन्य भाज्यांच्या किमती वाढवणाऱ्या प्रभावामुळे पुन्हा महागाई दराने त्या उच्चांकी पातळीशी बरोबरी साधली आहे. भाज्यांच्या किमतींचे एकूण ग्राहक किंमत निर्देशांकातील भारमान ६.०४ टक्के इतके आहे. गेल्या महिनाभरात टॉमेटोच्या किलोमागे २०० रुपयांपल्याड कडाडलेल्या किमतीचे प्रतिबिंब म्हणून महागाई दराचा भडका उडालेला दिसत आहे.

गेल्याच आठवडय़ात, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाईवाढीची जोखीम लक्षात घेऊन व्याजदर आहे त्या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि २०२३-२४ साठी किरकोळ महागाई दरात ५.१ टक्क्यांवरून, ५.४ टक्क्यांपर्यंत वाढीचा सुधारित अंदाज व्यक्त केला. जुलै-सप्टेंबर या तिमाहीसाठी तो तब्बल एक टक्क्यांनी वाढवून ६.२ टक्क्यांवर नेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात सोमवारी जाहीर झालेले आकडे रिझर्व्ह बँकेच्या अनुमानापेक्षा किती तरी जास्त आल्याचे दिसून येते.

ग्रामीण भारताला सर्वाधिक चटके

जुलैमध्ये ग्रामीण चलनवाढीचा दर ७.६३ टक्क्यांवर नोंदवला गेला, जो शहरी चलनवाढीच्या ७.२ टक्क्यांच्या दरापेक्षा वरचढ राहिला. आधीच्या जूनमध्ये ग्रामीण व शहरी भागासाठी प्रमाण याच्या उलट म्हणजे अनुक्रमे ४.७२ टक्के आणि ४.९६ टक्के असे शहरवासियांना अधिक झळ देणारे होते.

खाद्यान्न महागाई ३३ महिन्यांच्या उच्चांकावर

खाद्यपदार्थाची महागाई जुलैमध्ये ११.५१ टक्क्यांवर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०२० नंतरची म्हणजे मागील ३३ महिन्यांत गाठली गेलेली ही सर्वोच्च पातळी आहे. जूनमध्ये ती ४.५५ टक्के आणि मागील वर्षी जुलैमध्ये ६.६९ टक्के या पातळीवर होती. खाद्यान्न महागाईतील महिनागणिक दुपटीहून अधिक वाढीमागे, मागील वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या किमतीतील ३७.४३ टक्क्यांची वाढ कारणीभूत आहे. त्याचवेळी तृणधान्ये आणि इतर उत्पादनांची महागाई १३ टक्क्यांनी वाढल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

घाऊक महागाईचाही चढता आलेख

देशातील घाऊक महागाईचा दर जुलैमध्ये सलग चौथ्या महिन्यात उणे पातळीच्या खाली राहिला. असे असले तरी त्यात वाढ होऊन तो तीन महिन्यांची उच्चांकी पातळीवर गेल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक महागाई दर ठरविला जातो. तो जुलैमध्ये तीन महिन्यांची उच्चांकी पातळी गाठून उणे १.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून महिन्यात हा दर उणे ४.१२ टक्के होता. त्यावेळी तो साडेसात वर्षांतील नीचांकी पातळीवर होता. जुलैमध्ये भाज्यांच्या किमतीत ६२.१२ टक्के वाढ झाल्याने निर्देशांकात वाढ झाली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यांत निर्देशांक १४.०७ टक्के होता. खाद्यपदार्थाच्या महागाईत जुलैमध्ये १४.२५ टक्के वाढ झाली आहे. जूनमध्ये ही वाढ केवळ १.३२ टक्के होती. खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने, वस्त्रे यांच्या किमतीत घट झाल्याने घाऊक महागाई दर जुलैममध्ये उणे पातळीखाली राहण्यास मदत झाली.

व्याजदर वाढीचे सावट

रिझर्व्ह बँकेकडून किरकोळ महागाई दराचे ४ टक्क्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात २ टक्के अधिक आणि उणे गृहित धरले जाते. नुकत्याच झालेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने महागाई दर वाढल्यास व्याजदर वाढीचे संकेत दिले होते. जुलैमध्ये ७ टक्क्यांवर गेलेला महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अनुमानापेक्षा जास्त असल्याने आगामी काळात दीर्घकालीन कर्जाच्या व्याजदरांत वाढीची शक्यता निर्माण झाली आहे.जुलैतील किरकोळ महागाई दर सव्वा वर्षांतील उच्चांकावर