wife of Pahalgam terror attack victim On upcoming India vs Pakistan match in Asia Cup 2025 : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवार, १४ सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान संघ एकमेकांसमोर येणार आहेत. हे दोन्ही संघ जगात कोठेही एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा तो सामना पाहण्याकरिता चाहते नेहमीच गर्दी करतात. दरम्यान उद्या होणाऱ्या या सामना रद्द केला जावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. काही महिन्यांपूर्वी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने पाकिस्तान विरोधात क्रिकेट खेळू नये अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी या समान्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या सामन्यावर बहिष्कार घातला जावा अशी भावना व्यक्त केली आहे

“पहिल्यांदा तर बीसीसीआयने भारताने पाकिस्तानबरोबर सामना खेळणे स्वीकारायला नको होते. आपल्याच देशात हे स्वीकारून लोक मोठी चूक करत आहे. मला वाटते की बीसीसीआयला त्या २६ कुटुंबांविषयी काहीही भावना नाहीत. ते २६ कुटुंब याबरोबरच ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेले जवान, यांच्या मृत्यूची तुम्हाला काहीही किंमत नाही, कारण कदाचित तुमच्या कुटुंबातील कोणी यात गेलं नाही. आपले क्रिकेटपटू कुठे झोपले आहेत? क्रिकेटपटू राष्ट्रवादी असतात असे म्हटले जाते. म्हणून क्रिकेटकडे आपला राष्ट्रीय खेळ म्हणून पाहिले जाते. परंतु एक-दोन क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे येऊन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा, असे म्हटले नाही. बीसीसीआयची एवढी हिंमत नाही की बंदुकीच्या धाकावर खेळायला लावतील. त्यांनी आपल्या देशासाठी उभे राहिले पाहिजे. तरी ते उभे राहत नाहीत.” असे मत ऐशन्या द्विवेदी यांनी व्यक्त केले आहे.

ऐशन्या द्विवेदी एएनआयशी बोलताना पुढे म्हणाल्या की, मी लोकांना, जे या सामन्याला स्पॉन्सर करत आहेत त्यांना विचारू इच्छिते की, तुमच्यातली माणुसकी, २६ कुटुंबांसाठी राष्ट्रीयत्व संपले आहे का? कारण यांना स्पॉन्सर्स तर मिळालेच आहेत. याचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. तुमच्या भावना संपल्या आहेत का? तुमच्या देशासाठी तुम्ही काही करूच इच्छित नाहीत का?

पैसा दहशतवादासाठी वापरला जाईल

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मला इतकं लक्षात येत आहे की, अखेर हे सगळं पैशांसाठी आहे. सामन्यातून जितका महसूल मिळेल तो कशासाठी वापरला जाईल? पाकिस्तान तो फक्त त्याचा वापर दहशतवादासाठी करेल. कारण पाकिस्तानात आलेला प्रत्येक रुपया हा दहशतवादासाठी वापरला जातो. तो फक्त एक दहशतवादी देश आहे. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. तुमच्या देशात इतक्यांदा दहशतवादी हल्ले झाले आहेत. तरी तुम्ही त्या देशाबरोबर सामना खेळाल, त्यांना महसूल द्याल आणि पुन्हा आपल्यावर हल्ला करण्याची तयार कराल की ते पुन्हा येऊन आपल्याला मारतील, कारण तुम्ही त्यांना मजबूत करला. का ते मला समजत नाही. मी लोकांना विनंती करते की त्यांनी यावर बहिष्कार टाकावा. हा सामना बघायला जाऊ नका, तुमचा टीव्ही चालू करू नका.

भारत- पाकिस्तान सामना १४ सप्टेंबरला रंगणार आहे. या सामन्याला क्रिकेट चाहत्यांसह अनेक दिग्गज खेळाडूंनी विरोध केला. मात्र, भारत सरकारने या सामन्यासाठी होकार दिला आहे. त्यामुळे हा सामना होणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान काही क्रिकेटपटूंनी आपण हा सामना पाहणार नसल्याचं म्हटलं आहे.