१५ ऑगस्ट, अर्थात आपल्या देशाचा, भारताचा स्वातंत्र्य दिन! अनेक राष्ट्रभक्तांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, याची कृतज्ञ जाणीव राष्ट्रध्वजाला वंदन करताना प्रत्येक भारतीयाच्या मनात असते. अर्थात फक्त कृतज्ञ असणं पुरेसं आहे का? कष्टपूर्वक मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आपण योग्य आदर राखतोय का? खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नक्की काय मिळवलं आपल्या पूर्वसूरींनी? क्रांतिकारकांपासून समाजसुधारकांपर्यंत अनेकांनी ’स्वातंत्र्य’ हे लक्ष्य समोर ठेवून त्यानुसार आपल्या आयुष्याची आखणी केली. स्वत:चं शिक्षण, दैनंदिन व्यवहार..साऱ्यांतच आवश्यक ते बदल करून, योग्य ती कौशल्यं-क्षमता अंगी बाणवून मगच त्यांनी इंग्रजी सत्तेशी नियोजनबद्ध लढा दिला. आणि त्यात ते यशस्वी ठरले, आपण स्वतंत्र झालो.
आज, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६५ वर्षांनी दिसणारं चित्र काय आहे? दर काही दिवसांनी प्रकाशात येणारे घोटाळे, भ्रष्टाचार, सामुहिक बलात्कार, बेरोजगारी, वाढता दहशतवाद, प्रत्येक निवडणुकीत यूएसपी ठरणारा ’बिजली-पानी-सडक’ हा मुद्दा तर सोडाच पण अन्न-वस्त्र-निवारा यांसारख्या मूलभूत गरजासुद्धा सगळ्यांच्या भागलेल्या दिसत नाहीत. आणि बारा रुपयांत भारतीय ’आम आदमी’ पोटभर जेवू शकतो, हा काही लोकप्रतिनिधींना असलेला ठाम विश्वास! केंद्राच्या अहवालात विकासदराचे आकडे फार सुखद वाटतात, पण वास्तवात तशी परिस्थिती आहे?
देशाचंही राहू देत, आपण अगदी आपल्या शहर-गावाचा आढावा घेतला तर काय आढळतं? खराब रस्ते, सततचे अपघात, सार्वजनिक वाहतूकीची दुरवस्था, वेडीवाकडी फुगत चाललेली शहरं, महिलांमध्ये वाढत चाललेली असुरक्षिततेची भावना..यादी संपणार नाही. तर मग या परिस्थितीला काय म्हणायचं? आहोत आपण ’स्व’तंत्र? आहोत आपण जबाबदार या स्थितीला? आपण शिस्त पाळतो? आपण सार्वजनिक ठिकाणी स्वत:हून स्वच्छता राखतो? पर्यावरणाचा विचार करतो? मतदानाचा दिवस ही आणखी एक सुट्टी न मानता आवर्जून मतदानाचं कर्तव्य पार पाडतो? १५ ऑगस्टच्या निमित्तानं मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी (सक्तीचं नसल्यास) स्वय़ंप्रेरणेनं ध्वजवंदनाला जातो?
’मी भारतीय आहे, आणि स्वतंत्र भारताचा मला अभिमान आहे’ हे ठामपणे, सच्चेपणाने म्हणायचं असेल, तर काय बदल घडायला हवेत? हे विचार समजून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. विचारांना कृतीची जोड द्या आणि आपल्या देशाला आता स्वातंत्र्य नेमकं कशापासून हवं, याबद्द्लचे तुमचे विचार मोजक्या शब्दांत आमच्यापर्यंत नक्की पोचवा. तुम्ही तुमचे विचार खालील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता…
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2013 रोजी प्रकाशित
स्वातंत्र्य…कशापासून?
१५ ऑगस्ट, अर्थात आपल्या देशाचा, भारताचा स्वातंत्र्य दिन! अनेक राष्ट्रभक्तांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, याची कृतज्ञ जाणीव राष्ट्रध्वजाला वंदन करताना...
First published on: 13-08-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence from whom