पंतप्रधानांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक

शिमला : देशात दैनंदिन १.२५ कोटी लसमात्रा दिल्या जात असून अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही हे प्रमाण अधिक आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेश हे सर्व पात्र लाभार्थ्यांंना पहिली लस मात्रा देणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. अनेक अडचणींवर मात करून हे यश या राज्याने मिळवले असल्याचे त्यांनी दृकश्राव्य परिषदेत सांगितले. सिक्कीम व दादरा—नगर हवेली या प्रदेशांनीही पूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.

मोदी यांनी आरोग्य कर्मचारी व लस  लाभार्थींशी चर्चा केली. लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य केल्याबाबत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

शिमला जिल्ह्यातील नागरी रुग्णालयातील डॉ. राहुल यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनी सांगितले, की  जर एका कुपीतील अकरा लस मात्रा पूर्णपणे दिल्या गेल्या तर १० टक्के खर्च वाचतो. आरोग्य कर्मचारी कार्मो देवी  यांच्याशी उना येथे संवाद साधण्यात आला. देवी यांनी  सांगितले, की आपण २२ हजार ५०० लसमात्रा दिल्या आहेत. देवी यांच्या पायाला दुखापत झालेली असताना त्यांनी ही कामगिरी केली आहे.

दरम्यान, लाहौल  स्पिती येथील नवांग उपासक यांनी मोदी यांना सांगितले, की ‘अटल’ बोगद्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. ७०० ते ८०० स्थानिक रहिवाशांनी पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था करण्याची परवानगी अधिकाऱ्यांकडे मागितली आहे.

१६७ दिवसांतील सर्वात कमी करोना मृत्यूंची नोंद

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ३८,९४८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आणि २१९ जण करोनाने मृत्युमुखी पडले. गेल्या १६७ दिवसांतील हा सर्वात कमी आकडा आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

देशातील करोनाबाधितांची संख्या ३,३०,२७,६२१ वर पोहोचली असून, करोना मृत्यूंचा आकडा ४,४०,७५२ इतका झाला आहे. ४८ दिवसांनंतर मृत्युदर कमी होऊन १.३३ टक्के इतका झाला आहे. यापूर्वी २३ मार्च रोजी एकाच दिवसात १९९ मृत्यूंची नोंद झाली होती.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,०४,८७४ इतकी कमी झाली असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १.२३ टक्के आहे. आतापर्यंत ३,२१,८१,९९५ लोक बरे झाले असून हे प्रमाण ९७.४४ टक्के आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ६८.७५ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.

गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या २१९ जणांमध्ये ७४ केरळमधील, तर ६७ महाराष्ट्रातील आहेत.