सध्या बिटकॉइन या डिजिटल चलनाची चलती आहे पण संगणकामार्फत देवाणघेवाण होणाऱ्या या चलनामुळे भारतासह अनेक देशांत संगणकात मालवेअर सोडणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे मात्र फावले आहे. ज्या संगणकावरून या आभासी चलनामार्फत व्यवहार होतात त्यांच्यात मालवेअर आले आहे.
ताज्या पाहणीनुसार जगात किमान १२ हजार संगणकांना या मालवेअरचा फटका बसला आहे. त्यामुळे जगातील या चलनाच्या नियंत्रकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. ट्रेन्ड मायक्रो या बिटकॉइन मायनिंग मालवेअर सुरक्षा कंपनीने सांगितले की, बिटकॉइन वापरणाऱ्यांना धोका आहे, त्यात भारतातील असे बिटकॉइन वापरणाऱ्यांना फटका बसला आहे. याचा फटका बसलेले सर्वाधिक देश हे आशिया पॅसिफिक भागातील आहेत त्यात जपानला सर्वाधिक फटका बसला. त्याखालोखाल ऑस्ट्रेलिया, भारत व तैवान यांचा समावेश आहे. बिटकॉइन व्यवहारात सायबर गुन्हेगार तुमच्या संगणकाला लक्ष्य करतात व यातील व्यवहार हे कायमस्वरूपी असतात असे ट्रेन्ड मायक्रोचे व्यवस्थापकीय संचालक धन्या ठक्कर यांनी सांगितले. बिटकॉइनचा व्यवहार निनावी असला तरी त्यातील व्यवहारांची नोंद सार्वजनिक पातळीवर होत असते व त्याच्या पाऊलखुणा दिसत असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार तुमची व्यक्तीगत माहिती मिळवू शकतात.
    बिटकॉइन वापराच्या नियंत्रणासाठी कुठलीही नियंत्रक संस्था नाही व जर तुमच्या बिटकॉइनवर दरोडा पडला तर तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार अशी अवस्था होते.
  सध्या ६७ डिजिटल चलने व्यवहारात असून त्यांची एकूण किंमत १३ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. त्यात बिटकॉइनचा वाटा ९ अब्ज डॉलर इतका आहे.