पीटीआय, इस्लामाबाद, गुरूदासपूर
भारताने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरची कर्तारपूर मार्गिकेबाबत तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीची पहिली बैठक आज झाली. दोन्ही देशात तणाव असतानाही कर्तारपूर मार्गिकेचा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे पाकिस्तानने आधीच स्पष्ट केले आहे.
शून्य बिंदूवर भारत व पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात दोन्ही बाजूचे प्रत्येकी पंधरा अधिकारी सहभागी होते. सुमारे दोन तास ही बैठक चालली, त्यात तांत्रिक मुद्दय़ांवर चर्चा झाली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. ज्या शून्य बिंदूच्या ठिकाणी बैठक झाली तेथे प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. पाकिस्तानच्या बाजूने याबाबत अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही. पाकिस्तानातील कर्तारपूर येथे असलेल्या कर्तारपूरसाहिब व भारतातील गुरूदासपूर जिल्ह्य़ात असलेल्या डेरा बाबा नानक ही दोन ठिकाणे कर्तारपूर मार्गिकेने जोडली जाणार आहेत.
शीख मुलीच्या धर्मातराचा मुद्दा गंभीर- अमरिंदर
चंडीगड : पाकिस्तानातील नानकाना साहिब येथे शीख मुलीचे अपहरण करून तिचे सक्तीने इस्लाममध्ये धर्मातर केल्याचा मुद्दा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानपुढे उपस्थित करावा, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली आहे. शीख मुलीचे अपहरण करून तिचे मुस्लीम धर्मात सक्तीने धर्मातर केल्याचा प्रकार पाकिस्तानात झाला असून चित्रफितीत तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार या मुलीचे अपहरण करून तिचे इस्लाम धर्मात जबरदस्ती धर्मातर केल्याचे म्हटले आहे. त्यात पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्तक्षेपाची मागणीही करण्यात आली होती.