भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या हेलिकॉप्टर्सची बांधणी करण्याचे ठरवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जाहीर केले. कामोव्ह-२२६ टी हेलिकॉप्टर दोन्ही देशांनी मिळून तयार करण्यासही रशिया तयार असल्याचे संकेत गुरुवारी दोन्ही नेत्यांच्या चर्चेत मिळाले होते.
भारतातील दोन ठिकाणी १२ अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता रशियाशी बोलणी सुरू असल्याचेही मोदी यांनी सांगितले. दहशतवादी गट आणि त्यांचे लक्ष्य ठरलेले देश यांच्यात कुठलाही भेदभाव न करता दहशतवादाशी लढण्यासाठी जगाने एकत्र यावे, असेही मत मोदींनी व्यक्त केले.रशिया हा भारताचा सशक्त आणि विश्वासार्ह मित्र असून दोन्ही देशांची ‘खरोखर महत्त्वाची’ भागीदारी असल्याचे नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना भारत व रशियातील वार्षिक परिषदेदरम्यानच्या चर्चेत सांगितले. दोन्ही बाजूंनी संरक्षण व ऊर्जा यांसह इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्य्ये करारांबाबत वाटाघाटी केल्या.