नवी दिल्ली : रामलीला मैदानावर रविवारी आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया’ आघाडीची ‘लोकतंत्र बचाओ रॅली’ कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नसून राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी आहे, असे असे काँग्रेसच्या वतीने शनिवारी स्पष्ट करण्यात आले.

पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या लोककल्याण मार्गाजवळ आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या या सभेतून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची ‘वेळ संपली आहे’ असा संदेश दिला जाईल, असे पक्षाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> मोले घातले लढाया : बिच्चारे मंत्री!

सभेसंबंधित पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि माजी पक्षप्रमुख राहुल गांधी यासंह पक्षाचे ज्येष्ठ नेते सभेला मार्गदर्शन करतील. ही सभा व्यक्तीकेंद्रीत नाही म्हणून याला ‘लोकतंत्र बचाव रॅली’ म्हणतात. ही एका पक्षाची सभा नसून २७ ते २८ पक्ष यात सहभागी आहेत, असे रमेश म्हणाले.

वाढती महागाई, ४५ वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी दर, आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि शेतकऱ्यांवरील अन्याय हे मुद्दे या सभेत विरोधी पक्षांचे नेते मांडतील. केंद्रीस संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केले जात असून हा मुद्दाही सभेत मांडला जाणार आहे, असे रमेश यांनी सांगितले.

ओडिशात काँग्रेसची इच्छुकांकडे निधीची मागणी

भुवनेश्वर : ओडिशा प्रदेश काँग्रेस समितीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांना प्रत्येकी ५० हजार रुपये पक्षाच्या कोषागरात जमा करण्यास सांगितले आहे. प्रचारसामग्रीच्या पुरवठयासाठी इच्छुक उमेदवारांकडून हा निधी घेतला जात आहे. ओडिशाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सरत पटनायक यांनी यासंबंधी संभाव्य उमेदवारांना पत्र लिहिले आहे. उमेदवारांना जाहिरात आणि मोहीम सामग्रीसाठी पक्षाने निवड केलेल्या उमेदवारांकडून ५० हजार रुपयांचा धनादेश स्वीकारण्यास तयार आहोत असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.  ओडिशामध्ये लोकसभेच्या २१ तर विधानसभेच्या १४७ जागा आहेत. त्यासाठी काँग्रेसकडे सुमारे तीन हजार इच्छुकांचे अर्ज आले आहेत.