दहशतवाद सर्वत्रच फोफावतो आहे. आंतरराष्ट्रीय गुन्ह्य़ांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे शांतता आणि सौहार्दता यांना धोका निर्माण झाला आहे. हे लक्षात घेत आशियाई राष्ट्रांनी दहशतवादविरोधाच्या मुद्दय़ावर एकत्र येण्याची आणि परस्परांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले. तिसऱ्या ‘बिमस्टेक’ परिषदेसाठी त्यांचे म्यानमार येथे आगमन झाले.
सात राष्ट्रांचा समावेश असलेल्या ‘बे बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टि-सेक्टरल टेक्निकल अॅण्ड इकॉनॉमिक कोऑपरेशन’ (बिमस्टेक)च्या या परिषदेत बोलताना भारतीय पंतप्रधानांनी आर्थिक मंदीकडेही लक्ष वेधले. व्यापार आणि गुंतवणुकीच्या मुद्दय़ांवर परस्परांशी सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या वेळी अधोरेखित केले. आशिया खंडाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी या ‘सहकारा’ला पर्याय नाही, असे पंतप्रधान म्हणाले. बिमस्टेक परिषद ही भारताचे ‘लूक ईस्ट’ अर्थात पूर्वेकडे पहा धोरण आणि थायलंडचे ‘पश्चिमेकडे पहा’ परराष्ट्र धोरण यांची आविष्कृती मानले जाते.
अखेरचा परदेश दौरा
डॉ. मनमोहन सिंग यांचा भारतीय पंतप्रधानपदाचा दहा वर्षांचा कार्यकाल लवकरच संपुष्टात येत असून हा त्यांचा पंतप्रधान या नात्याने अखेरचा परदेश दौरा असल्याचे म्हटले जात आहे. खुद्द पंतप्रधानांकडूनही या दौऱ्यात श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड, भूतान, नेपाळ या राष्ट्रांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे.
इच्छा अपुरीच!
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे जन्मस्थान पाकिस्तानात आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत एकदा तरी जन्मगावी भेट देण्याची डॉ. सिंग यांची इच्छा होती. मात्र, पाकिस्तानने वेळोवेळी काढलेल्या कुरापती आणि त्यामुळे बिघडलेले संबंध यांमुळे पंतप्रधानांची ही इच्छा अपुरीच राहणार आहे.