भारत-चीन संबंधांत सध्या सर्वाधिक कटूता!; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली

‘आपले संबंध नक्की कसे आहेत आणि त्यात काय योग्य घडलेले नाही याबद्दल चीनला काही शंका असेल असे मला वाटत नाही.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली

भारत आणि चीन यांच्या संबंधांचा सध्या सर्वात कटुकाळ आहे. चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्याच्याकडे कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत याचे उत्तर आता चिनी नेतृत्वालाच द्यायचे आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.

शांतता राखण्यासाठी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या प्रक्रियेची प्रगती आवश्यक असून, सर्वंकष द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा तो आधार आहे, असे भारताने चीनला सांगितले आहे.

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित मुद्द्यांवर लवकर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय करारांचे पूर्णपणे पालन करून काम करायला हवे, यावर जयशंकर यांनी १६ सप्टेंबरला ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमध्ये आपले चिनी समपदस्थ वांग यी यांच्यासोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत भर दिला होता.

‘आपले संबंध नक्की कसे आहेत आणि त्यात काय योग्य घडलेले नाही याबद्दल चीनला काही शंका असेल असे मला वाटत नाही. माझे समपदस्थ वांग यी यांना मी अनेकदा भेटलो आहे. तुम्ही अनुभव घेतलाच असेल, की मी पुरेसा स्पष्ट बोलतो आणि त्यात काही संदिग्धता नसते. त्यामुळे त्यांना ऐकायची इच्छा असेल तर त्यांनी ते ऐकले असेल याची मला खात्री आहे,’ असे ‘ग्रेटर पॉवर कॉम्पिटिशन : दि इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर सिंगापूरमधील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरम येथे आयोजित करण्यात आलेल्या गटचर्चेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी सांगितले.

‘आमचे संबंध सध्या वाईट काळातून जात आहेत, कारण चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्यांच्याकडे अजूनही कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही आणि आपल्याला द्विपक्षीय संबंध त्यांना कुठे न्यायचे आहेत याबद्दल फेरविचाराची आवश्यकता असल्याचे संकेत त्यातून मिळतात. मात्र याबद्दल त्यांनाच उत्तर द्यायचे आहे,’ असे पूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या संघर्षाच्या संदर्भात जयशंकर म्हणाले.

आमचे संबंध सध्या वाईट काळातून जात आहेत, कारण चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्यांच्याकडे अजूनही कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही. -एस. जयशंकर, भारताचे परराष्ट्रमंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India china relations china violates agreements akp

ताज्या बातम्या