गेले काही महिने सीमावर्ती भागात चीनकडून सातत्याने होणारी घुसखोरी आणि त्यामुळे भारताची असलेली नाराजी यांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या करण्यात आलेल्या प्रसन्न स्वागताने चीन दौऱ्यास सुरुवात झाली. वादग्रस्त अशा सीमाप्रश्नासह, स्टेपल व्हिसा-पाकपुरस्कृत दहशतवादास चीनकडून घातले जाणारे खतपाणी असे मुद्दे भारताने चीनसमोर उपस्थित केले. मात्र त्याचबरोबर, उभय देशांमध्ये शांतता आणि सौहार्दता टिकावी यासाठी ‘सीमा सुरक्षितता सहकार्य करारा’सह आठ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
‘जेव्हा हे दोन देश हस्तांदोलन करतात तेव्हा जगाचे लक्ष वेधले जाते’ अशा शब्दांत भारतीय पंतप्रधानांनी चीनसह झालेल्या करारांबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे गेल्या काही महिन्यात चीनकडून अनेकदा उल्लंघन झाले होते. तसेच, या भेटीत सीमाप्रश्नावर सहकार्य करार करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी दौऱ्यावर जाताना व्यक्त केला होता. त्यास अनुसरूनच, उभय देशांमध्ये सीमावर्ती भागात शांतता-सहकार्य प्रस्थापित व्हावे म्हणून दहा कलमांचा समावेश असलेला ‘सीमा सुरक्षा सहकार्य करार’ करण्यात आला.
त्याबरोबरच, सांस्कृतिक देवाण-घेवाण, सामरिक सहकार्य, ‘सिस्टर सिटी’ उभारणी अशा अनेक मुद्यांवर सहकार्य करार करण्यात आले. विशेष म्हणजे भारत, बांगलादेश, म्यानमार आणि चीन या देशांमध्ये ‘कॉरिडॉर’ उभारण्यास सहकार्य करण्यास चीनने होकार दर्शविला आहे.