नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील सीमावादानंतर बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाच वर्षांपासून खंडित असलेली भारत-चीन थेट विमानसेवा पूर्ववत होणार आहे. चीनच्या तियानजिन शहरात शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली होती. या भेटीनंतर येत्या २६ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्रालयातर्फे देण्यात आली.
दोन्ही देशांमधील थेट विमान सेवा २०२०च्या करोना काळापासून बंद ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्व लडाखमधील चार वर्षांहून अधिक काळाच्या सीमा संघर्षाच्या अखेरनंतरही ही सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. ‘या वर्षाच्या सुरुवातीपासून भारत आणि चीनमधील संबंध सामान्य करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील नागरी विमान वाहतूक अधिकारी दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवा पूर्ववत करण्यासाठी आणि सुधारित हवाई सेवा कराराबाबत तांत्रिक स्तरावर चर्चा करत आहेत,’ असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर ‘या निर्णयामुळे हवाई संपर्क मोठ्या प्रमाणात वाढेल, लोकांमधील देवाणघेवाणीला चालना मिळेल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य मजबूत होण्यास हातभार लागेल, ’असे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने समाजमाध्यम संदेशात म्हटले आहे.
‘इंडिगो’ची कोलकाता-ग्वांगझू विमानसेवा भारताकडून ‘इंडिगो’ आणि चीनच्या ‘चायना ईस्टर्न’ या दोन्ही विमान कंपन्या दोन्ही देशांमध्ये थेट उड्डाणे पुन्हा सुरू करणाऱ्या पहिल्या कंपन्या असतील. कोलकाता ते ग्वांगझू ही दररोजची विमानसेवा येत्या २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे ‘इंडिगो’तर्फे सांगण्यात आले. २०२० च्या सुरुवातीपर्यंत दोन्ही देशांमधील थेट उड्डाणे सुरू होती. ‘येत्या २६ ऑक्टोबर २०२५ पासून कोलकाता ते चीनमधील ग्वांगझूला (सीएएन) दररोज विनाथांबा विमान सेवा पुन्हा सुरू होईल,’ असे इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे.तसेच लवकरच दिल्ली आणि ग्वांगझू दरम्यान थेट विमान सेवाही सुरू होईल, असेही संकेत देण्यात आले.