कोलंबो : भारताने सोमवारी श्रीलंकेला डॉर्निअर विमान हस्तांतरित केले. त्यामुळे श्रीलंकेची सागरी टेहळणी क्षमता वाढणार असून भारत-श्रीलंका दरम्यानचे द्विपक्षीय संरक्षण संबंध आणखी मजबूत झाले आहेत. भारत आणि श्रीलंका यांची सुरक्षा परस्परसहकार्य आणि विश्वासामुळे भक्कम झाली आहे, असे येथील भारतीय उच्चायुक्त गोपाल बाग्लाय यांनी म्हटले आहे.

भारता आपला ७६ वा स्वातत्र्य दिन साजरा करीत असताना झालेल्या या विमान हस्तांतरण सोहळय़ाला श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे उपस्थित होते. विशेष म्हणजे श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात उद्या, मंगळवारी चीनचे क्षेपणास्त्र आणि उपग्रहांचा माग काढणारे जहाज दाखल होत आहे.

भारतीय नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल एस. एन. घोरमाडे हे श्रीलंकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. श्रीलंकेच्या हवाई दलाच्या कातूनायके या तळावर सोमवारी झालेल्या सोहळय़ात घोरमाडे आणि बाग्लाय यांनी श्रीलंकेच्या नौदलाकडे सागरी टेहळणीसाठीचे डॉर्निअर विमान सुपूर्द केले. हा तळ कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक आहे. भारताचे उच्चायुक्त बाग्लाय यावेळी म्हणाले की, उभय देशांचे सहकार्याचे संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हे डॉर्निअर २२८ विमान आम्ही श्रीलंकेला भेट दिले आहे. यातून श्रीलंकेची सागरी सुरक्षेच्या दृष्टीने असलेली गरज पूर्ण होणार आहे. अन्य क्षेत्रांतही उभय देश एकमेकांना सहकार्य करीत आहेत.

नवी दिल्लीतील सूत्रांनी सांगितले की, भारतीय नौदलाच्या संशोधनातून तयार झालेले हे विमान श्रीलंका देण्यात आल्याने त्यांची तातडीची संरक्षणात्मक गरज पूर्ण होणार आहे. या विमानाच्या वापरासाठी भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना चार महिने सखोल प्रशिक्षण दिले आहे. भारताच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि श्रीलंकेचे संरक्षण क्षेत्रातील संबंध येत्या काही काळात आणखी मजबूत होणार आहेत.

श्रीलंकेची दोन विमानांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीलंकेने जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीत झालेल्या चर्चेत भारताकडे दोन डॉर्निअर रेकोनेसन्स विमानांची मागणी केली होती. भारताने ते मान्य केले असून भारत सरकारच्या हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लि.कडून या दोन विमानांची बांधणी सुरू आहे. ही विमाने तयार होऊन श्रीलंकेच्या ताब्यात दिल्यानंतर सोमवारी देण्यात आलेले विमान भारतीय नौदलाला परत केले जाणार आहे.