भारताने हाफिज सईदविरोधात कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी केला आहे. पाकिस्तानमधील न्यायालयाने कायद्यानुसारच सईदची सुटका केली. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताने २६/११ च्या हल्ल्यासंदर्भात पुरावे दिल्यावरही अब्बासी यांनी हा दावा केला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी एका आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हाफिज सईदबाबत भाष्य केले. अब्बासी म्हणाले, लाहोरमधील तीन न्यायाधीशांच्या पीठाने सईदच्या सुटकेबाबत निर्णय दिला. कायद्याला अनुसरुनच हा निर्णय घेण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. सईदवर फक्त आरोप आहेत. भारताने त्याच्याविरोधात ठोस पुरावा दिलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे तालिबानी नेते सक्रीय आहेत, त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, तालिबानी नेते पाकमध्ये असतील तर त्यांच्यावर कारवाई करु. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील सैन्य माघारी घेऊ नये. तसेच अफगाणिस्तान सरकारनेही तालिबानी नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
हाफिज सईदची गेल्या आठवड्यात नजरकैदेतून सुटका झाली होती. यानंतर भारताने पाकवर टीका केली होती. तसेच अमेरिकेनेही पाकवर दबाव टाकला होता. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पुन्हा अटक करून त्याच्यावर खटला भरण्यात यावा अन्यथा पाकिस्तानने द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशाराच अमेरिकेने दिला होता. पाकिस्तानने त्याला पकडून गुन्हा दाखल केला नाही, निष्क्रियता दाखवली तर पाकिस्तानच्या जागतिक प्रतिमेवर फार वाईट परिणाम होतील, असे अमेरिकेने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, हाफिज सईदला पुन्हा नजरकैदेत ठेवल्याचा दावा काही इंग्रजी प्रसारमाध्यमांनी केला होता. मात्र सईद सध्या बाहेरच असून त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे स्पष्ट झाले आहे. नजरकैदेतून सुटका झाल्यावरही हाफिज सईदने काश्मीरसाठी लढा सुरुच राहणार, असे सांगितले होते.