एप्रिल महिना आला की खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे डोळे आपसूकच पगारवाढीकडे वळतात. आपल्या कामाचे मूल्यांकन कधी एकदा होते आणि किती वाढ मिळते याबद्दलच कुतूहल असते, पण गेल्या वित्तीय वर्षांतील आर्थिक मंदीचा फटका यंदा पगारवाढीच्या आकडय़ांमधून डोकावतो आहे. भारतीय कंपन्यांकडून यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना सरासरी १०.३ टक्क्यांची पगारवाढ देण्यात आली आहे. गतवर्षीच्या पगारवाढीच्या आकडय़ाच्या तुलनेत ही वाढ ०.३ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे यंदाचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही.
देशभरातील विविध क्षेत्रांमधील पगारवाढीच्या आकडय़ांचा अभ्यास आणि सर्वेक्षण नुकतेच एका मानव संसाधन सल्लागार कंपनीतर्फे करण्यात आले. सर्वच क्षेत्रांत गतवर्षीच्या पगारवाढीच्या तुलनेत घट असल्याचे निरीक्षण या अभ्यासात पुढे आले. पगारवाढीची सर्वात अल्प टक्केवारी किरकोळ विक्री क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू झाली असून ती अवघी ९.१ टक्का आहे.
१०.३ टक्के या भारतीय कंपन्यांच्या पगारवाढीच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा आरोग्य, जैवसंशोधन आणि औषधनिर्मिती याच क्षेत्रांमध्ये अधिक पगारवाढ देण्यात आली आहे. ही पगारवाढ १२.४ टक्के असून, ती गतवर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी कमीच आहे.
व्यवस्थापनाच्या मधल्या स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मिळालेली पगारवाढ ही सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे.
नोकरी बदलण्याच्या प्रमाणातही यंदा घट झाली आहे. उत्तम काम केल्याबद्दल आर्थिक किंवा अन्य स्वरूपांत देण्यात आलेले ‘प्रोत्साहन पुरस्कार’ आणि आपल्या क्षमतांचा परिपूर्ण वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले ‘कौशल्य आणि ज्ञान विकास कार्यक्रम’ यांमुळे ही घट झाल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून पुढे आला आहे. मात्र असे असले तरीही माहिती तंत्रज्ञान (१६.४%), प्रसारमाध्यमे (१५.६%) या क्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी बदल झाले.