२०१९ पर्यंत एलईडी प्रकाश योजनेचा १०० टक्के वापर करणारा भारत जगातील पहिला देश ठरेल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला. एलईडी वापरामुळे वर्षाला ४० हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ईईएसएल’ या सरकारी कंपनीने इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांशी करार केला आहे. या करारानुसार कंपन्यांच्या ५४,५०० पेट्रोल पंपांवर एलईडी बल्ब, ट्युबलाईट्स आणि पंख्यांची विक्री करण्यात येणार आहे.

ईईएसएल आणि तेल कंपन्यांमध्ये झालेल्या करारावेळी गोयल यांच्यासह पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हेही उपस्थित होते. एलईडीच्या वापरामुळे मोठा फायदा होणार आहे. जवळपास वर्षाला ४० हजार कोटी रुपयांची बचत होणार आहे. २०१९ पर्यंत एलईडी प्रकाश योजनेचा १०० टक्के वापर करण्यात येणार आहे. याबाबतीत भारत जगातील पहिला देश ठरणार आहे, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. आम्ही केवळ आश्वासने देत नाहीत, तर ती पूर्णही करतो असे सांगून त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला. तेल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार, पेट्रोल पंपांवर बल्ब, ट्युबलाईट आणि पंख्यांची विक्री केली जाणार असून तिथे ईआयएमची सुविधा नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला दिल्लीत ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सुरू करण्यात येईल. इतर राज्यांमध्येही ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेट्रोल पंपांवर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मदतीने सार्वजनिक सेवा केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर पायाभूत ऑनलाईन सुविधा मिळतील. आधार नोंदणी, आधार अद्ययावत करणे आदींसह वीज आणि दूरध्वनी देयकेही ऑनलाईन भरता येणार आहेत. तसेच काही पेट्रोल पंपांवर एटीएमही लावण्यात आलेले आहेत, असे प्रधान यांनी सांगितले.