सहा महिन्यांत ६८ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक; गुजरात व तमिळनाडूही पिछाडीवर

परकीय गुंतवणूकदारांना नेहमीच आकर्षक वाटणाऱ्या महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ आणखीनच वाढला आहे. गेल्या संपूर्ण वर्षांमध्ये (२०१५-१६) आलेल्या ‘एफडीआय’ला चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांमध्येच मागे टाकले आहे. या ओघाने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे वेगळे सांगण्याची गरज उरली नाही. किंबहुना या कालावधीत आख्ख्या देशामध्ये आलेल्या ‘एफडीआय’मध्ये (१,४४,६७४ कोटी) एकटय़ा महाराष्ट्राचा हिस्सा जवळपास निम्मा आहे.

केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या औद्य्ोगिक उत्पादन व प्रोत्साहन खात्याकडून (डीआयपीपी) ‘एफडीआय’च्या गुंतवणुकीचा तपशील जाहीर केला जातो. ‘डीआयपीपी’ने १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या पहिल्या दोन तिमाहीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे अव्वलस्थान अधिकच झळाळून उठले आहे. एकेकाळी गुजरात, दिल्ली आणि तमिळनाडूशी महाराष्ट्राची स्पर्धा असायची. पण गेल्या दीड वर्षांंमध्ये चित्र झपाटय़ाने बदलल्याची आकडेवारी सांगते. २०१५-१६मध्ये दिल्लीत ८३,२८८ कोटी गुंतविले गेले; पण चालू वर्षांतील सहा महिन्यांत हा आकडा एकदम २३,४१५ कोटींवर आला. गुजरातची स्थिती तर आणखीनच अवघडल्यासारखी झाली. ‘व्हायब्रंट गुजरात’मध्ये लाखो कोटी रूपयांच्या गुंतवणुकीच्या घोषणा होत असतात. पण गेल्या दीड वर्षांंत गुजरातमधील ओघ आटलाय. १५-१६मध्ये १४,६६७ कोटी आणि आताच्या सहा महिन्यात फक्त आणि फक्त २,४६२ कोटी असे सुमारे सतरा हजार कोटींची गुंतवणूक झाली. तमिळनाडूचीही तीच अवस्था आहे. १५-१६मध्ये तमिळनाडूत २९,७८१ कोटी आले; पण मागील सहा महिन्यांतील रक्कम ४,१३६ कोटींवर घसरली. कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्ये परकीय गुंतवणूकदारांच्या पसंतीस अद्यप पडत नसल्याचे दिसते. बाकीच्या राज्यांमध्ये तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच गुंतवणूक झाली.

महाराष्ट्रातील ‘एफडीआय’ प्रामुख्याने वित्तीय सेवा, तंत्रज्ञानाधारित सेवा, दूरसंचार, संगणक, व्यापार आणि वाहनउद्य्ोगांत आला आहे.

तपशील काय?

२०१५-१६मध्ये महाराष्ट्रात एकूण ६२ हजार ७३१ कोटी रूपये ‘एफडीआय’मधून आले होते. याउलट मागील सहाच महिन्यांत (१ एप्रिल १६ ते ३० सप्टेंबर १६) तब्बल ६८ हजार ४०९ कोटींची थेट परकीय गुंतवणूक झाली. गुजरात, तमिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या स्पर्धक राज्यांच्या ढिसाळ कामगिरीने तर महाराष्ट्राचा झपाटा अधिकच उठून दिसतो आहे. ही गुंतवणूक फक्त समभागातील (इक्विटी) आहे. त्यात जर परताव्याची फेरगुंतवणूक व अन्य भांडवली गुंतवणूक गृहित धरली तर हा आकडा आणखीनच जास्त फुगेल.

सहामाहीतील गुंतवणूक (कोटी रूपयांमध्ये)

chart

(* महाराष्ट्रामध्ये दादरा नगर हवेली व दमण दीव या केंद्रशासित प्रदेशांचा, तमिळनाडूमध्ये पुदुच्चेरीचा आणि दिल्लीमध्ये राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा म्हणजेच ‘एनसीआर’चा समावेश आहे.)