बिहारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेत्याने भारतासंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. राजदचे नेते अब्दुल बारी सिद्दकी यांनी एका जाहीर कार्यक्रमामध्ये आपण आपल्या मुलांना परदेशात शिक्षण झाल्यानंतर तिथेच स्थायिक होण्याचा सल्ला दिल्याचं म्हटलं आहे. भारत हा मुस्लीमांसाठी राहण्यासारखा देश राहिलेला नाही असं वादग्रस्त विधान सिद्दकी यांनी केलं आहे. या विधानावरुन भारतीय जनता पार्टीनेही संताप व्यक्त करत ही राजदची विचारसणी असल्याचा टोला लगावला आहे.
सिद्दकी यांनी आपल्या मुलांचं शिक्षण परदेशात झालं असून आपण त्यांना तिकडेच स्थायिक होण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं. “मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा सध्या हार्डवर्डमध्ये शिक्षण घेत आहे. मुलगी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून उत्तीर्ण झाली आहे. देशातील वातावरण सध्या असं आहे की मी माझ्या मुलांना सांगितलं आहे की तिकडेच नोकरी करा. नागरिकत्व मिळालं तरी घेऊन टाका,” असं मुलांना सुचवल्याचं सिद्दकी म्हणाले. तसेच, “भारतातील सध्याची परिस्थिती तुम्ही सहन करु शकणार नाही. तुम्ही विचार करु शकता की एखादे आई-वडील किती त्रास सहन करुन आपल्या मुलांना हे सांगत आहेत की आपली मातृभूमी सोडा,” असंही सिद्दकी म्हणाले.
“भारत हा मुस्लिमांसाठी राहण्यासारखा देश राहिलेला नाही,” असं सिद्दकी यांनी म्हटल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ‘टाइम्स नाऊ’ला सिद्दकी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेच्या आधारे दिलं आहे. सिद्दकी यांच्या या विधानावरुन भाजपाने संताप व्यक्त केला आहे. भाजपाचे बिहारमधील प्रवक्त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.
“त्यांनी जे विधान केलं आहे तीच राष्ट्रीय जनता दलाची भूमिका दर्शवते,” अशी टीका बिहार भाजपाचे प्रवक्ते निखिल आनंद यांनी केली आहे. “सिद्दकींसारखी लोक स्वत:ला उदारमतवादी म्हणवतात मात्र त्यांची विचारसणी ही मदरशांमधील लोकांसारखी आहे,” असा टोलाही आनंद यांनी लगावला. “ते आपल्याच देशाविरोधात गरळ ओकत आहेत,” असं म्हणत आनंद यांनी आपला संताप व्यक्त केला.