इस्रायलमधील नैसर्गिक वायूंच्या साठ्यांसाठी भारतातील ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) बोली लावणार आहे. जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये हा महत्त्वपूर्ण करार ठरु शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये इस्रायलमधील नैसर्गिक वायूसाठ्यांविषयी भाष्य केले. बहुसंख्य आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या इस्रायलमधील नैसर्गिक वायूसाठ्यांच्या बोलीकडे पाठ फिरवतात. इस्रायलमध्ये पाऊल टाकल्यास या क्षेत्रात वर्चस्व असलेले अरब राष्ट्र नाराज होतील, असे या कंपन्यांना वाटते. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण ठरते. इस्रायलच्या सागरी क्षेत्रातील नैसर्गिक वायूसाठ्यांसाठी ओएनजीसी बोली लावणार, असे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे एक पथक इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. भूमध्य सागरात है नैसर्गिक वायूंचे साठे आहेत. भारताच्या शिष्टमंडळाने याची पाहणी केली. तसेच लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली. यासंदर्भात शिष्टमंडळाने इस्रायलमधील अधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये इस्रायलचा दौरा केला होता. संरक्षण क्षेत्रात इस्रायल आणि भारत या देशांचे चांगले संबंध होते. मात्र आता तंत्रज्ञान, तेल, ऊर्जा या क्षेत्रातील व्यापारी संबंध सुधारण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. ओएनजीसीला नैसर्गिक वायूसाठा मिळाल्यास दोन्ही देशांमध्ये हा महत्त्वपूर्ण करार ठरू शकतो. इस्रायलसह लेबननमधील नैसर्गिक वायूसाठ्यांच्या लिलाव प्रक्रियेतही ओएनजीसी इच्छुक असल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India ongc to bid for israel oil and gas exploration blocks says oil minister dharmendra pradhan
First published on: 04-09-2017 at 19:13 IST