Farooq Abdullah on India, Pakistan War: जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरमधील अस्थिरतेला त्यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.
श्रीनगर येथे माध्यमांशी बोलत असताना फारूख अब्दुल्ला यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. ते म्हणाले, उद्या काय होईल, हे आम्हाला माहीत नाही. आज दोन्ही देश लढाईसाठी सज्ज होत आहेत. हे होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दहशतवादी आणि त्यांचे सूत्रधार पकडले गेल्यास यातून उपाय निघू शकतो.
पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली त्याबद्दल फारूख अब्दुल्ला यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पाकिस्तानकडून तणाव निर्माण केला जात असल्याबाबत टीका केली. विशेषतः पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या अलीकडच्या चिथावणीखोर विधानांवर टीका केली.
फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले, “सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेत त्रुटी राहिल्या, याबद्दल शंका नाही. आपल्याकडे सर्वकाही सुरळीत सुरू आहे, हे कदाचित त्यांना (पाकिस्तान) रुचलेले नाही. आपल्या लोकांविरोधात काही काळापासून अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे त्यांनी हल्ला केला असावा. पण भारतातील मुस्लीम समुदायावर याचा काय परिणाम होणार, याचा त्यांनी विचार केला नाही. गेल्या १० वर्षांपासून आमच्याविरोधात अपप्रचार सुरू आहे. मशिदींना आग लावली जात आहे, मुस्लीम समुदायाचे उच्चाटन करण्याची भाषा वापरली जाते. याचा आम्ही आधीपासूनच सामना करत होतो.”
त्यातच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी द्वीराष्ट्राचा सिद्धांत मांडून आगीत आणखी तेल ओतले, अशी टीका फारूख अब्दुल्ला यांनी केली.
तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात धाडण्याचा निर्णय योग्य नसल्याचेही फारूख अब्दुल्ला म्हणाले. “ही कृती चांगली नाही. हे मानवतेच्या विरुद्ध आहे. काही लोक ७० तर काही जण २५ वर्षांपासून येथे राहत आहेत. त्यांना बाहेर काढणे योग्य नाही”, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले.