Kerala nurse Nimisha Priya in Yemen : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये फाशीची शिक्षा दिली जाणार होती. मात्र, ही फाशीची शिक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील असून भारत सरकार या प्रकरणात मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. निमिषा प्रियाच्या येमेनमधील फाशीच्या प्रकरणावर आता भारताने आपली भूमिका मांडली आहे. भारत या प्रकरणाच्या मुद्द्यावर मित्र राष्ट्रांशी संपर्कात असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितलं की, “येमेनमधील एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेली केरळमधील ३६ वर्षीय परिचारिका निमिषा प्रिया हिचं फाशी प्रकरण हे अतिशय संवेदनशील आहे. मात्र, तरीही भारत सरकार या मुद्द्यावरून मित्र राष्ट्रांशी संपर्कात आहे. तसेच सरकारने निमिषा प्रियाच्या कुटुंबाला कायदेशीर मदत पुरवली आहे आणि नियमित कॉन्सुलर भेटींची व्यवस्था केली आहे”, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

निमिषा प्रियाच्या येमेन’मधील फाशी प्रकरणाबाबत परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन समोर आलं आहे. रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “आम्ही कायदेशीर मदत पुरवली आहे. कुटुंबाला मदत करण्यासाठी एका वकीलाची नियुक्ती करण्यात आली आहे. निमिषा प्रियाच्या कुटुंबाला नियमित कॉन्सुलर भेटी दिल्या जातील याची आम्ही खात्री केली आहे. येमेनमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सध्या १६ जुलै २०२५ रोजी होणारी तिच्या फाशीला स्थगिती दिली आहे. आम्ही या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि सर्वतोपरी मदत करत राहू. या प्रकरणात आम्ही काही मित्र राष्ट्रांच्या संपर्कात आहोत”, असं त्यांनी स्पष्ट केलं. आहे.

नेमकं प्रकरण काय?

निमिषा प्रिया ही २००८ साली कामानिमित्त येमेन येथे गेली होती आणि तिचे कुटुंब केरळमध्येच होते. तिने २०१५ साली मेहदी याच्याबरोबर स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यापूर्वी तिने इतर अनेक रुग्णालयांमध्ये काम केलं होतं. मेहदी हा तिचा स्थानिक पार्टनर होता. येमेनमध्ये पार्टनर म्हणून स्थानिक व्यक्तीला उद्योगात बरोबर घेण्यासंबंधीचा कायदा आहे.

येमेनमध्ये क्लिनिक सुरू करण्यासाठी निमिषा प्रिया हिने तलाल अब्दो मेहदीला बरोबर घेतलं. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि निमिषा प्रिया हिने मेहदीवर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केला. यामधून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर निमिषा प्रियाचा पासपोर्ट मेहदीने घेतला. पासपोर्ट परत घेण्यासाठी प्रियाने कथितपणे त्याला सेडेटिव्हजचे इंजेक्शन दिले. पण त्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर येमेनमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना निमिषा प्रियाला अटक करण्यात आली. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने निमिषा प्रियाला २०२० साली मृ्त्यूदंडाची शिक्षा दिली. तिच्या कुटुंबियांनी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला आव्हान दिलं होतं. पण २०२३ साली ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तिला १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती. पण आता पुढील आदेशापर्यंत ही फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.