क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च अशा ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर पदकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे खेळभावनेला बट्टा लावणाऱ्या उत्तेजक सेवनकर्त्यां देशांमध्ये वाडाने (जागतिक उत्तेजकविरोधी संघटना) जाहीर केलेल्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. अॅथलेटिक्सचा राजा अशी बिरुदावली मिरवणारा रशिया (१४८) या यादीत अव्वल स्थानी आहे. इटली (१२३) दुसऱ्या स्थानी आहे.
उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे बंदीची कारवाई झालेल्या तसेच नियमभंगासाठी ताकीद मिळालेल्या प्रकरणांचा वाडाच्या अहवालात समावेश आहे. ९६ तत्सम प्रकरणांसह भारत तिसऱ्या स्थानी आहे. ९६ पैकी ५६ पुरुष तर २३ महिला क्रीडापटू आहेत. १३ क्रीडापटू स्पर्धेबाहेर दोषी आढळले. १९२० पासून ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेत भारताची पदक संख्या अवघी २४ आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मामुली असणारी ही पदकांची संख्या वाढवण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कामगिरी उंचावण्यासाठी भारतीय क्रीडापटू जाणतेपणी किंवा अजाणतेपणी उत्तेजकांच्या आहारी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध सामाजिक स्तरातल्या खेळाडूंना उत्तेजकांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी प्रशिक्षण योजनेच्या कार्यक्षमतेवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंगपटू कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजकांचा वापर करत असल्याचे पुन्हा एकवार समोर आले आहे. अन्य खेळांमध्ये बास्केटबॉल (३), ज्युडो (३), तायक्वांदो (३), कुस्ती (३), वुशू (३), बॉक्सिंग (२), कनाकिंग (१), नेमबाजी (१), सॉफ्ट टेनिस (१) यांचा समावेश आहे. पॅरा अॅथलेटिक्स आणि पॅरा ज्युडोपटूही या यादीत आहेत.
भारतात २०१४मध्ये उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन (एडीआरव्ही) केल्याची ९६ प्रकरणे समोर आली आहे. विद्यापीठ, विविध वयोगट स्पर्धा तसेच आंतर विभागीय स्पर्धामधील प्रकरणांमुळे हा आकडा वाढल्याचे अव्वल भारतीय क्रीडापटूंनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Apr 2016 रोजी प्रकाशित
उत्तेजक सेवनकर्त्यां देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी
उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे बंदीची कारवाई झालेल्या तसेच नियमभंगासाठी ताकीद मिळालेल्या प्रकरणांचा वाडाच्या अहवालात समावेश आहे.

First published on: 29-04-2016 at 02:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India rank 3 in stimulating medicine taking list