गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येनंतर कॅनडातील जस्टीन ट्रुडो सरकारने भारतावर केलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अशातच कॅनडातील एका अधिकाऱ्याने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप करत खलिस्तानी समर्थकांच्या हत्येमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर आता भारतानेही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

शनिवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कॅनडातील अधिकाऱ्याच्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे जैस्वाल यांनी म्हटलं. हे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. आम्ही याचा निषेध करतो. याबाबत आम्ही कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स पाठवला आहे. तसेच कठोर शब्दात निषेध नोंदवला आहे, अशी प्रतिक्रिया रणधीर जैस्वाल यांनी दिली.

हेही वाचा – Amit Shah Canada : “कॅनडातील फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह”, ट्रुडो सरकारचे गंभीर आरोप

पुढे बोलताना, हे आरोप म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा प्रयत्नांचा एक भाग असून अशा आरोपांमुळे दोन्ही देशातील संबंधामध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. कॅनडातील भारतीय अधिकाऱ्यांच्या फोन टॅप होत असल्याचा आरोपही जैस्वाल यांनी यावेळी केला. कॅनडा सरकारकडून भारतीय अधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत आहेत. याबाबतही आम्ही कॅनडाच्या उच्चायुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे. तसेच याचा निषेधनही नोंदवला आहे. हे आंतराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – India Canada Row: खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येमागे अमित शाह? कॅनडाच्या आरोपाची अमेरिकेकडून दखल; म्हणाले, “चिंताजनक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

कॅनडाचे उपराष्ट्रपती डेव्हिड मॉरिसन आणि गुप्तवार्ता सल्लागार नेथाली ड्रौइन यांनी अमित शाह यांच्यावर कथित हिंसक कारवायांचा आरोप केला होता. कॅनडामधील ‘द ग्लोब अँड मेल’ने याबाबतील वृत्त प्रसिद्ध केले होतं. रॉयटर्सच्या वृत्तानुसार कॅनडाचे उप परराष्ट्रमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी संसदीय समितीला सांगितलं की शीख फुटीरतावाद्यांविरोधातील हिंसेमागे अमित शाह आहेत. मॉरिसन संसदीय समितीसमोर म्हणाले, “एका पत्रकाराने मला विचारलं की त्या हिंसाचारामागे असणारी व्यक्ती म्हणजे अमित शाह आहेत का? त्यावर मी पुष्टी केली की हो तीच व्यक्ती त्या सर्व घटनांमागे आहे” विशेष म्हणजे यावेळीदेखील कॅनडाने भारतावर नुसते आरोप केले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही.