देशभरात करोना व्हायरस पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. भारतात मागच्या २४ तासात २१५१ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे आता देशभरातल्या सक्रिय रूग्णांची संख्या ११ हजार ९०३ इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी ८ च्या दरम्यान मागील २४ तासांत किती करोना रूग्ण आढळले त्याची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार ही माहिती समोर आली आहे. देशात सध्याच्या घडीला ११ हजार ९०३ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. एकूण जेवढ्या केसेस आत्तापर्यंत आढळल्या त्या तुलनेत हे प्रमाण ०.०३ टक्के आहे. रूग्ण बरे होण्याचा देशातला दर हा ९८.७८ टक्के इतका आहे. आत्तापर्यंत देशभरातले ४ कोटी ४१ लाख ६६ हजार ९२५ रूग्ण हे करोनातून बरे झाले आहेत. देशात करोनाच्या रूग्णांची संख्या १९ डिसेंबर २०२० ला सर्वाधिक म्हणजेच १ कोटींहून जास्त होती. त्यानंतर ही संख्या २०२१ मध्येही वाढली. ४ मे २०२१ ला करोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या दोन कोटींहून अधिक झाली होती. तर २३ जून २०२१ ला ही संख्या तीन कोटींहून अधिक झाली होती. तर २०२२ मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात ही संख्या ४ कोटींच्या पुढे गेली होती. आता सध्या देशभरात ११ हजारांहून जास्त अधिक सक्रिय रूग्ण आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. XBB १.१६ व्हेरियंटने चिंता वाढवली देशात सध्या कोरोना व्हायरसच्या नव्या XBB १.१६ व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. जगासह देशातही कोविड व्हायरस संसर्ग अजूनही सुरुच आहे. करोनाच्या XBB १.१६ व्हेरियंटचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत खूप जास्त आहे. यामुळे सरकारने सावधगिरी खबरदारी बाळगण्यास सांगितलं आहे.