पीटीआय, तियान्जिन
भारत आणि रशियादरम्यानची मैत्री अधिक दृढ करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात सोमवारी सहमती झाली. चीनच्या तियान्जिन येथे आयोजित करण्यात आलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांदरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा झाली. युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी मार्ग शोधावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
गेल्या काही महिन्यांपासून आयातशुल्काच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असताना पंतप्रधान मोदी यांनी रविवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर चर्चा केली. भारत रशियाकडून करत असलेल्या तेलखरेदीच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतलेली असताना या दोन्ही चर्चांना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
दोन्ही नेत्यांदरम्यान आर्थिक, वित्तीय आणि उर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. पुतिन ब्रिक्स परिषदेसाठी डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. १४० कोटी जनता त्यांची प्रतीक्षा करत आहे, असे मोदी यांनी त्यांना सांगितले.
यातून आपल्या विशेष सामरिक भागीदारीची व्याप्ती दिसते. अतिशय खडतर काळामध्ये भारत आणि रशिया हे मित्र देश खांद्याला खांदा लावून उभे राहिले आहेत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारत-रशिया संबंध पूर्णतः पक्षीय राजकारणाच्या पलिकडे आहेत आणि त्याला बहुसंख्य जनतेचा पाठिंबा आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेक दशके विशेष मैत्रीचे आणि विश्वासावर आधारित संबंध राहिले आहेत. – व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया