India at United Nations Human Rights Council : संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या नेटवर्कला आर्थिक मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या किंवा दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांकडून काही शिकण्याची आम्हाला गरज नाही, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या ६० व्या अधिवेशनात भारताचे राजदूत क्षितिज त्यागी म्हणाले, “ज्या देशाच्या नेतृत्वाने अलीकडेच स्वतःच्या देशाचं वर्णन ‘डम्प ट्रक’ असं केलं होतं, त्या देशाकडून आम्हाला पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्यांचा सामना करावा लागत आहे. हा देश या प्रतिष्ठित परिषदेत सातत्याने खोटं बोलत आला आहे. आता देखील या देशाने चुकीची माहिती सादर केली आहे.” मावनाधिकार परिषदेतील चर्चेवेळी पाकिस्तानने भारतासंदर्भात केलेल्या टिप्पणीवर ते उत्तर देत होते.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध
त्यागी यांनी यावेळी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. २२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची निर्घृण हत्या केली होती. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना या हल्ल्यामागे होती असंही त्यागी म्हणाले.
लादेनचा उल्लेख करत भारताचा पाकिस्तानला चिमटा
क्षितीज त्यागी पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये अमेरिकन लष्कराने केलेल्या कारवाईत मारला गेलेला अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा उल्लेख करत म्हणाले, “९/११ चा दहशतवादी हल्ला विसरू नका. आज या घटनेला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ९/११ चा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्याला आश्रय देणाऱ्या आणि त्याला शहीद म्हणून गौरवणाऱ्या पाकिस्तानचा ढोंगीपणा आपण इथे पाहात आहोत.”
स्वित्झर्लंडला जशास तसं प्रत्युत्तर
“पुलवामा, उरी, पठाणकोन, मुंबई… ही एक न संपणारी यादी आहे. स्वित्झर्लंडने इथे उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. स्वित्झर्लंडसारख्या आमच्या जवळच्या मित्राने आणि व्यावसायिक भागीदाराने अशा प्रकारे चुकीच्या आणि वरवरच्या टिप्पण्या करणं आश्चर्यकारक आहे. त्याऐवजी त्यांनी वर्णभेद, धार्मिक भेदभाव, इतर देशांमधील नागरिकांप्रती घृणा यांसारख्या आपल्या देशातील आव्हानांकडे लक्ष केंद्रित करावं.”
या अधिवेशनात स्वित्झर्लंडने अल्पसंख्याकांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर त्यागी यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं.