रोज सरासरी ६१ लाखांऐवजी ३५ लाख मात्रा

नवी दिल्ली : करोना विषाणूच्या साथीत २१ जूनपासून लसीकरण थंडावलेले असून त्यामुळे देशातील व्यवहार सुरळित होण्यास अडथळेच येणार आहेत. कारण टाळेबंदीचे चक्र अजून संपलेले नाही. काही ठिकाणी ती चालूच आहे.

कोविन मंचावर देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोविड १९  लशीच्या ६१.१४ लाख मात्रा २१ ते २७ जून या काळात रोज देण्यात आल्या. २८ जून ते ४ जुलै दरम्यान दैनंदिन पातळीवर ४२.९२ लाख  लसमात्रा देण्यात आल्या आहेत.  ५ ते ११ जुलै या काळात सरासरी लसीकरण ३४.३२ लाख मात्रांपर्यंत घसरले आहे. काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत  संमिश्र कल दिसत आहे.

हरयाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात व छत्तीसगड  या राज्यात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. २१ जून ते २७ जून दरम्यान लसीकरणाच्या मात्रा कमी झाल्या आहेत. केरळ, अंदमान, निकोबार बेटे, दादरा नगर हवेली, जम्मू व काशीर या राज्यात ते प्रमाण मध्यम आहे. आसाम व त्रिपुरा या राज्यात लसीकरणांमध्ये वाढ झाली असून दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण मात्र जास्त आहे. १४-२० जून दरम्यान ३३.१९ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी म्हटले आहे की, १.५४ कोटी लशी अजून राज्ये व कें द्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.  एकूण ३७.७३ कोटी जणांचे लसीकरण झाले आहे.

दिवसात ३७,१५४ जणांना लागण, ७२४ मृत्यू

देशात गेल्या एका दिवसात ३७ हजार १५४ जणांना करोनाची लागण झाल्याने बाधितांची एकूण संख्या तीन कोटी आठ लाख ७४ हजार ३७६ वर पोहोचली आहे तर तीन कोटींहून अधिक जण करोनातून बरे झाले आहेत, असे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशात गेल्या २४ तासांत आणखी ७२४ जणांना करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या चार लाख आठ हजार ७६४ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती चार लाख ५० हजार ८९९ वर पोहोचली आहे, उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या १.४६ टक्के इतके आहे, तर करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्क्य़ांवर आले आहे.

रविवारी देशात एकूण १४ लाख ३२ हजार ३४३ चाचण्या करण्यात आल्या असून देशातील एकूण चाचण्यांची सख्या ४३ कोटी २३ लाख १७ हजार ८१३ वर पोहोचली आहे,. करोनातून आतापर्यंत तीन कोटी १४ लाख ७१३ जण बरे झाले आहेत तर मृत्युदर १.३२ टक्के इतका आहे.

देशात गेल्या एका दिवसात ७२४ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी ३५० जण महाराष्ट्रातील आहेत तर आतापर्यंत चार लाख आठ हजार ७६४ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी एक लाख २५ हजार ८७८ जण महाराष्ट्रातील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

गर्दी टाळण्याचे आयएमएचे आवाहन

नवी दिल्ली : देशात करोनाची तिसरी लाट लवकरच येणे आता अटळ असल्याचा इशारा भारतीय वैद्यक परिषदेने (इंडियन मेडिकल असोसिएशन) सोमवारी दिला असून लोकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता राज्य सरकारे आणि केंद्र सरकारने घ्यावी, असे आवाहनही परिषदेने केले आहे.

जगन्नाथ पुरी येथे वार्षिक रथयात्रा सुरू झाल्याच्या, तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कंवर यात्रेला परवानगी देण्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर परिषदेने हा इशारा दिला आहे.

लोक करोनाचे निर्बंध पाळण्याबाबत बेफिकीर झाले असून सरकारी यंत्रणेचेही त्याकडे फारसे लक्ष नसल्याबद्दल परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाल्याने करोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो, याकडे परिषदेने लक्ष वेधले आहे. पर्यटन, धार्मिक यात्रा आणि कार्यक्रम हे आवश्यक असले तरी, ते काही महिने लांबणीवर टाकणे श्रेयस्कर ठरणार आहे, असे परिषदेचे म्हणणे आहे.

साथींबाबतचा जागतिक अनुभव आणि इतिहास पाहता करोनाची तिसरी लाट येणे अटळ दिसत आहे, पण अशा निर्णायक वेळी हा धोका टाळण्यासाठी लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक असताना सार्वजनिक बेफिकीरी दिसून येत आहे, याबद्दल परिषदेने खेद व्यक्त केला आहे.

केंद्रीय पर्यटनमंत्री किशन रेड्डी यांनी पर्यटकांना करोनाविषयक नियमांचे योग्यरित्या पालन करण्याचे आवाहन केले आहे.