पीटीआय, नवी दिल्ली
अमेरिकी सीमा शुल्क विभागाने जारी केलेल्या नव्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे अमेरिकेला जाणाऱ्या विमानांमध्ये मालवाहतूक करण्यासाठी हवाई वाहतूक कंपन्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने शनिवारी घेतला.
अमेरिकी प्रशासनाने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ३० जुलै रोजी अमेरिकी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या नव्या कार्यकारी आदेशानुसार १०० डॉलरपेक्षा अधिक किमतीच्या वस्तूंवर २९ ऑगस्टपासून अमेरिकेत सीमा शुल्क आकारले जाणार आहे. ८०० डॉलरपर्यंतच्या वस्तूंवरील सीमा शुल्क सवलत रद्द करण्यात आली आहे. पूर्वी कमी किमतीच्या वस्तू शुल्काशिवाय अमेरिकेत पोहोचत होत्या. मात्र नव्या निर्णयामुळे सीमा शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळेच हवाई कंपन्यांनी अमेरिकेत जाणाऱ्या विमानांमध्ये टपाली वाहतूक स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे केंद्रीय दळणवळण विभागाने अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र १०० डॉलरपर्यंतची पत्रे, कागदपत्रे आणि भेटवस्तूंसाठी ही सेवा सुरू राहणार आहे.
ट्रम्प यांचा निष्ठावंत भारतातील आगामी राजदूत
व्हाइट हाऊसचे कर्मचारी संचालक आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर निष्ठावंत समजले जाणारे सर्जियो गोर यांना भारतातील पुढील अमेरिकी राजदूत म्हणून नामांकित करण्यात आले आहे. व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवरून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. ३८ वर्षीय गोर यांना प्रमुख राजदूत पदावर नियुक्त करण्याची घोषणा करताना ट्रम्प यांनी सांगितले की ते दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष राजदूत म्हणूनही काम करतील.
आमच्याकडून तेलखरेदी थांबवा- जयशंकर
नवी दिल्ली : “भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल ज्यांना समस्या आहे, त्यांनी आमच्याकडून तेल खरेदी करणे बंद करावे,” अशा शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी अमेरिकेला फटकारले. व्यवसायाभिमुख अमेरिकी प्रशासनासाठी काम करणारे लोक इतरांवर व्यवसाय करत असल्याचा आरोप करणे गमतीदार आहे, असे जयशंकर म्हणाले.