India-UK FTA : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक महत्वाचे निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयांचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत हालचालींना वेग आला असून भारत सरकारच्या अनेक उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर कधीही कारवाई करू शकतं, अशा भितीने पाकिस्तानची चलबिचल वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “माझे मित्र पीएम कीर स्टार्मर यांच्याशी बोलून आनंद झाला. एका ऐतिहासिक टप्प्यात द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि युनायटेड किंग्डमने मुक्त व्यापार करार (FTA) आणि दुहेरी योगदान करार यशस्वीरित्या पूर्ण केला आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

“तसेच हे महत्त्वाचे करार दोन्ही देशातील व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करतील आणि दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मिती आणि नवोपक्रमांना चालना देतील. मी पंतप्रधान कीर स्टार्मर यांचं लवकरच भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहे”, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वस्तू आणि सेवा दोन्हींचा समावेश असलेला संतुलित आणि व्यापक हा मुक्त व्यापार करार द्विपक्षीय व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना देईल. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि याचा फायदा दोन्ही देशांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.