India-US Relationship: भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापार तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. भारत सातत्याने रशियाकडून खरेदी करत असलेले कच्चे तेल आणि अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुली करण्यास नकार दिल्याने दोन्ही देशांमधील व्यापार करार होऊ शकलेला नाही. अशात अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत सर्जियो गोर यांनी नुकतेच स्पष्ट केले की, येत्या काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू होतील. याचबरोबर भारताला चीनकडून पुन्हा एकदा अमेरिकेच्या बाजूने वळवण्यास त्यांचे प्राधान्य असणार आहे.
चीनचा उल्लेख करत भारत आणि अमेरिकेतील संबंधांबाबत बोलताना सर्जिओ गोर म्हणाले की, “भारत आणि अमेरिकेमध्ये चीनपेक्षा बरेच साम्य आहे. बऱ्याच काळापासून आम्ही संपर्कात नाही. पुन्हा संपर्क निर्माण करण्यासाठी केवळ मीच नव्हे, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील वैयक्तिकरित्या यासाठी प्रयत्न करत आहेत.”
भारताला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न
“सध्या आपल्याला अडचणी येत असल्या तरी, आम्ही त्या सोडवण्याच्या मार्गावर आहोत. भारत सरकारशी, भारतातील लोकांशी असलेले आमचे संबंध अनेक दशकांपासूनचे आणि ते चिनी लोकांशी असलेल्या संबंधांपेक्षा खूपच चांगले आहेत”, असे गोर पुढे म्हणाले.
“खरे सांगायचे तर, भारताला चिनी विस्तारवादाची चिंता आहे आणि चिनी विस्तारवाद केवळ भारताच्या सीमेवर नाही तर तो संपूर्ण परिसरात आहे. त्यामुळे भारताला आमच्या बाजूने खेचून चीनपासून दूर करणे हे सर्वोच्च प्राधान्य असेल”, असेही गोर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोर यांच्या भारत-अमेरिका संबंधांबाबतच्या विधानाकडे भार सकारात्मक पद्धतीने पाहत आहे. सूत्रांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत दोन्ही देशातील व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय भेटी अपेक्षित आहेत. “येत्या काही दिवसांत व्यापार आणि संरक्षण उपकरणांवरील चर्चेला वेग येईल अशी अपेक्षा आहे आणि या टप्प्यावर उच्चस्तरीय भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असे एका सूत्राने सांगितले. याबाबत द इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
भारताकडून जास्त अपेक्षा
गोर म्हणाले की, “भारत आणि अमेरिका सध्या सक्रियपणे वाटाघाटी करत आहेत आणि ट्रम्प यांनी पुढील आठवड्यात भारतीय वाणिज्य आणि व्यापार मंत्र्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. त्यात एका आशादायक कराराचा समावेश असेल. सध्या आपण करारापासून फार दूर नाही. खरे तर, ते कराराच्या बारीकसारीक गोष्टींवर वाटाघाटी करत आहेत. आम्हाला इतर देशांपेक्षा भारताकडून जास्त अपेक्षा आहेत. मला वाटते की पुढील काही आठवड्यात हे मुद्दे सोडवले जातील.”